>>मृणाल जाधव
अपर्णा सचिन पाटील हे समाजभान व समाजाविषयी कळकळ असलेलं काव्य क्षेत्रातील एक आघाडीचं नाव. त्यांचे ‘फक्त तुझ्यासाठी’ व ‘मनातला गारवा’ हे दोन काव्यसंग्रह वाचनात आले. प्रेम, निसर्ग, भक्तिभाव, नातीगोती अशा विविध स्तरांवर ही कविता फुलली असली तरी अनेक कविता या अंतर्मन ढवळून काढणाऱया आहेत. कवयित्रीचे समाजभान अंतर्मुख करणारं आहे. अगदी साधे शब्द; परंतु विश्वाचं सार गर्भात घेतल्यासारखे उमटत राहतात. यातील वेदनाही मन पिळवटणाऱया आहेत. निसर्ग असेल वा मानवी भावभावना, अनेकदा माणूस हतबल होतो, मेटाकुटीला येतो. जीवनातील दुःखाचे डोंगर पार करताना वाचा फोडायची तरी कुणाकडे? हा प्रश्न त्याला पडतो. सृष्टीचा कर्ताकरविता देव असल्याचे म्हणतात. दुष्काळामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. ते दुःख ‘साकडं’ या कवितेतून दिसतं…
का देवा वागतोस असा
थोडं तरी सांग,
वर्षभराच्या कष्टाला या
का मारतोस अशी टांग
समुद्राच्या लाटांची तीव्रता ही किनाऱयावर थांबून कळत नाही. कवयित्रीचा पिंडही त्या उसळणाऱया लहरीप्रमाणेच आहे. प्रचंड उत्साह, मनाच्या गाभ्यापर्यंत उतरण्याची क्षमता वादातीत आहे. दुःख असो वा सुख, शब्दांची धार ही सतत जाणवत राहते. मैत्रिणीच्या आठवणीनं घायाळ झालेले ‘तुझ्याचसाठी’ या कवितेतील शब्द असे आहेत… शब्दांनी नेहमीच, मैत्रीचे धरले पाय, कधी भावनेच्या पुढे, चालले कुणाचे काय?
सखासोबती हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक सोनेरी पान. मात्र हेच पान गळून पडत असताना निर्माण झालेला अश्रूंचा ओलावा अस्वस्थ करणारा आहे. साहजिकच ‘प्रेमातला ओलावा’ या कवितेतील…
मिळालं ते सगळं, अगदी भरभरून होतं,
विसरण्यासाठी माझ्याकडे मात्र, आतलं काहीच नव्हतं…
सारखी रचना व्यथित करणारी आहे. हळवं, संवेदनशील मन हा या कवितांचा पाया असून तो भक्कम आहे. त्यामुळेच ‘शब्दांशी बोलू हवे ते, भावनांना म्हणेन कवेत ये’ किंवा ‘विसरून सारे विश्व हे, मस्तीत पंख पसरावे’, ‘रुणझुणता गार वारा, निळसर मोरपिसारा’सारखं मनाचं फुलपाखरू विहरतानाही नजरेस पडतं. स्वतशी प्रामाणिक राहणं हा गुणही कवितेत आढळतो. त्यामुळेच काही कवितेत काढलेले विचारप्रवर्तक चिमटेही भावतात, तसे ते स्वतची मीमांसा करणारेही आहेत. ‘मीही एक नवकवी’ या कवितेत…
माझी कविता, मी कवी, माझाच पगडा महान
माझ्यापुढे बाकी कवी, पडतात किती लहान…
सहजसोप्या भाषेत केलेलं हे भाष्य. अगदी समर्पक असं. एकंदरीतच अपर्णा पाटील यांची नजर विशाल व प्रौढ आहे, मन संवेदनशील आहे, लेखणीचं लेणं लाभलेलं आहे.
कवयित्री ः अपर्णा सचिन पाटील
प्रकाशक ः सचिन असोसिएट्स, कोल्हापूर
किंमत ः रु.70/-