500 रुपयांच्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट

बाजारात 500 रुपयांच्या खऱ्या नोटांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी बनावट नोटांपासून दूर रहावे, असा महत्त्वपूर्ण अलर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. 500 रुपयांच्या नोटांमधील फरक ओळखणे अवघड झाले आहे. परंतु बारकाईने पाहिल्यानंतर हा फरक ओळखता येतो, असेही गृहमंत्रालयाने आपल्या अलर्टमध्ये म्हटलेय.

बनावट नोटा या ओळखता येऊ नये यासाठी खऱ्या नोटांप्रमाणे गुणवत्ता आणि छपाईसुद्धा खऱ्या नोटांशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बनावट आणि खऱ्या नोटा ओळखणे कठीण होऊ शकते. परंतु बनावट नोटा छापणाऱ्यांकडून 500 रुपयांच्या नोटेवरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ओळीमध्ये एक चूक झाली आहे. रिझर्व्ह या शब्दांमध्ये ईच्या ऐवजी एचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी 500 रुपयांच्या नोटेवरील स्पेलिंग तपासून घेणे खूप गरजेचे आहे. ई शब्दाच्या ऐवजी ए शब्द असल्यास 500 रुपयांची नोट बनावट आहे.

अशी ओळखा खरी नोट

सर्वात आधी नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँक आहे, याची खात्री करा. खऱ्या नोटेमध्ये उजवीकडे तळाशी अशोकचक्र आहे. नोटेच्या उजव्या आणि डाव्या बाजुला पाच छोट्या रेषा आहेत. नोटेच्या मागच्या बाजूला डावीकडे नोटेचे छपाईचे वर्ष दिले आहे. तर डाव्या बाजूला स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो व संदेश दिला आहे. मागच्या बाजुला उजव्या कोपऱ्यात देवनागरी भाषेत नोटेचे मूल्य लिहिलेले आहे. बनावट नोट आढळल्यास याची माहिती बँकेत जाऊन द्यावी.