योगी सर्वात मोठे भोगी; उत्तर प्रदेशात बनावट चकमकी; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप आरोप

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मोठमोठय़ा बाता मारतात; परंतु ते सर्वात मोठे भोगी आहेत. महाकुंभात अनेक लोकांचे प्राण गेले. उत्तर प्रदेशात बनावट चकमकीत अनेकजण मारले गेले. योगी राज्यातील लोकांना मोर्चेही काढू देत नाहीत. उत्तर प्रदेशच्या तुलनेत बंगालमध्ये खूप स्वातंत्र्य आहे, असा पलटवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मुस्लिम धर्मगुरूंच्या बैठकीत बोलताना त्यांनी योगींवर निशाणा साधला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री दंगलखोरांना शांतीदूत म्हणत आहेत; परंतु या दंगलखोरांना प्रेमाची भाषा कळत नाही. त्यांना काठीचीच भाषा समजते. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तेथील सरकारने दंगलखोरांना सूट दिली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. त्याला ममता बॅनर्जी यांनी आज प्रत्युत्तर दिले. मुर्शिदाबाद येथील दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. विरोधकांनी तृणमूल काँग्रेसचा हिंसाचारात सहभाग होता असा आरोप केला; परंतु तसे असते तर आमच्याच नेत्यांच्या घरावर हल्ले झाले नसते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. आमच्या पक्षाने वक्फ कायद्याविरोधात संसदेत कडक भूमिका घेतली. वक्फ कायद्याच्या विरोधातील लढाईत तृणमूल काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे, असेही त्या म्हणाल्या.