
रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या नानावटी रुग्णालयातील बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. अतुल वानखेडे असे या डॉक्टरचे नाव असून उद्या सोमवारी त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी वकील आणि पोलीस त्याची सर्व बोगस पदवी प्रमाणपत्रे आणि इतर पुरावे सादर करणार आहेत. अतुल वानखेडे याने युनिव्हर्सिटी ऑफ सेशल्स या विद्यापीठाची पदवी 2011 मध्ये पुण्याच्या केईएम रुग्णालयातून घेतल्याचा दावा केला आहे. परंतु संबंधित विद्यापीठ 2010 मध्येच बंद झाले आहे.
अतुल वानखेडे हा ऑर्थोपेडीक सर्जन म्हणून नानावटी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करत होता. अविनाश समिंदर (24) या रुग्णाच्या आणि भीम आर्मीचे अशोक कांबळे यांच्या सतर्कतेमुळे वानखेडेचे पितळ उघडे पडले. अविनाश हा वानखेडेकडे पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी गेला असता त्याने त्याला अत्यंत चुकीचे सल्ले दिले. त्यामुळे त्याचे पाठीचे दुखणे आणखी वाढले. अधिक चौकशी केली असता वानखेडेची पदवी बोगस असल्याचे समोर आले. अखेर अविनाश समिंदरने वरळी पोलिसांत धाव घेतली.
बंद झालेल्या विद्यापीठाची पदवी घेऊन करत होता उपचार
अतुल वानखेडे याने मुंबईतील विविध नामांकित रुग्णालयांत सेवा दिली असून सध्या तो नानावटी रुग्णालयात सेवा देत होता. पुण्याच्या केईएम रुग्णालयाकडे चौकशी केली असता त्यांनी अशाप्रकारची कोणतीही पदवी अतुल वानखेडेला दिली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच वैद्यकीय महाराष्ट्र परिषदेकडेही याबाबत चौकशी केली असता ही पदवी बोगस असल्याचे उघड झाल्याचे अशोक कांबळे यांनी सांगितले.