
निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते. पण सत्तेत येताच फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांना या वर्षीच नव्हे तर पुढच्या वर्षीही कर्जमाफी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. यामुळे राज्यातील शेतकरी विवंचनेत सापडले आहे. पैसे भरण्यासाठी बँकांचा तगादा, कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून शेतकरी जीवन संपवत आहेत. नांदेडच्या पाटोदा (थडी) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून जीवन संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिदास विश्वंभर बोंबले (40) या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी येथून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून 10 एप्रिल रोजी संताजी अंबेकर यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता 11 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह संताजी अंबेकर यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला लटकल्याचे आढळून आले.
पाटोदा (थडी) येथील मयत शेतकरी हरिदास बोंबले यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी येथून 1 लाख 83 हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतलेले कर्ज व व्याज वसुलीसाठी शेतकरी हरिदास बोंबले यांना बँकेकडून कर्ज भरावे, अन्यथा आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून शेतकरी हरिदास बोंबले यांनी दि.10 एप्रिल रोजी संताजी अंबेकर याच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताचे शवविच्छेदन कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. मयत शेतकरी हरिदास बोंबले यांच्यावर पाटोदा (थडी) येथे सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी मयताचे चुलतभाऊ माधव किशन बोंबले यांच्या माहितीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.