हातात बेड्या, पायात साखळदंड; बेकायदा हिंदुस्थानींसोबत अमेरिकेचं अमानुष वर्तन, व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घ्या…

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यापासून एकामागोमाग एक निर्णयांचा धडाका लावला आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्या लोकांविरोधातही ट्रम्प प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरू केली आहे. अनेक हिंदुस्थानी नागरिकही या कचाट्यात सापडले असून या नागरिकांना मायदेशी पोहोचवण्याची व्यवस्थाही अमेरिकेने केली आहे. त्यानुसार 104 हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान बुधवारी पंजाबच्या अमृतसरमध्ये उतरले.

अमेरिकेतून हद्दपार केलेल्या हिंदुस्थानींसोबत अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वर्तन करण्यात आले. बेकायदा हिंदुस्थांनींना हातात बेड्या आणि पायात साखळदंड घालून रवाना करण्यात आले असा दावा करण्यात आला होता. यामुळे सरकारवर चौफेर टीका होऊ लागली होती. मात्र सरकारने हे दावे फेटाळले असून व्हायरल करण्यात आलेला फोटो हिंदुस्थानींचा नसल्याचे म्हटले आहे. हे फोटो ग्वाटेमाला येथून हद्दपार करण्यात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांचे असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर एक बनावट फोटो शेअर केला जात आहे. या फोटोसोबत असा दावा केला जात आहे की अमेरिकेने बेकायदा हिंदुस्थानींना हद्दपार करताना त्यांना हातकड्या लावल्या आणि पायांना साखळदंडाने बांधून ठेवले. मात्र सदर फोटो हिंदुस्थानशी संबंधित नाही. ग्वाटेमाला येथून हद्दपार करण्यात आलेल्या नागरिकांचा हा फोटो असल्याचे सरकारच्या फॅक्ट चेक विभागाने एक्सवर पोस्ट करून स्पष्ट केले.

फोटोत नक्की काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पुरुषांच्या हातामध्ये बेड्या आणि पायात साखळदंड असल्याचे दाखवण्यात आले आहे. अनेक लोकांनी हे फोटो शेअर करत सरकारला धारेवर धरले होते. काँग्रेस नेत्यांनीही हा फोटो शेअर करत अमेरिकेतून 200 हून अधिक हिंदुस्थानी नागरिकांना अमानुष पद्धतीने हद्दपा करण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच लांब पल्ल्याच्या विमानात फक्त एकच शौचालय होत असाही दावा करण्यात आला होता.

बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन अमेरिकी विमान आले, सर्वाधिक घुसखोर गुजरात आणि हरयाणाचे;  महाराष्ट्राचे तिघेजण

आणखी एका व्हिडीओची पोलखोल

याच दरम्यान आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात काही लोकांच्या तोंडावर मास्क घातलेले असून हातात बेड्या दिसत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही लोक चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनिवासी हिंदुस्थानींचा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सरकारने हा दावाही खोडून काढत सदर नागरिक कोलंबियाचे असल्याचे म्हटले आहे.