
उन्हाळ्यात स्किन टॅनिंग ही फार मोठी समस्या निर्माण होते. चेहरा टॅन तर होतोच, पण हातपाय सुद्धा टॅन होतात. अशावेळी हे टॅनिंग घालवण्यासाठी काहीतरी करणं हे खूप गरजेचं होऊन बसतं. मग नेमकं करायचं काय तर, यावर अनेक घरगुती उपाय आपण अवलंबू शकतो. टॅनिंग घालवण्यासाठी सर्वात सुंदर उपाय म्हणजे नैसर्गिक फेसपॅक. नैसर्गिक फेसपॅक त्वचेला लावल्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसानही होत नाही. शिवाय आपल्याला त्यामधील पोषक तत्वांचा फायदाही मिळतो. तुमच्याही हातांना पायांना आणि चेहऱ्यावर टॅनिंग असेल तर हे साधेसोपे उपाय तुम्ही घरी नक्की करुन बघा.
पपई आणि मध यांच्यापासून फेसपॅक कसा करावा?
साहित्य- १ टीस्पून पपईची पेस्ट, १/२ टीस्पून मध
पपईची पेस्ट आणि मध मिसळून घ्या. हे मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर हे मिश्रण हातावर लावा. 15 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर आपले हात धुवा.
पपई आणि मधाच्या फेसपॅकचे फायदे?
पपई आणि मधाच्या फेसपॅकमुळे चेहरा तजेलदार आणि चमकदार बनतो. तसेच मुरुमांच्या समस्याही या फेसपॅकमुळे नाहीशा होतात. टॅन झालेल्या त्वचेवर हा फेसपॅक खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. टॅनिंग नष्ट करुन त्वचेला उत्तम पोषणही मिळते.
तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी फेसपॅक
साहित्य- 1 चमचा तांदळाचे पीठ, 1 चमचा गुलाबजल
तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी एकत्र करा. आता हे मिश्रण हातांच्या त्वचेवर लावा. 10 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल की मिश्रण सुकले आहे. नंतर साध्या पाण्याने हात धुवा. लक्षात ठेवा की हा घरगुती हॅण्ड पॅक हातात लावल्यावर हातांची हालचाल करु नका.
तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी फेसपॅकचे फायदे?
तांदळाच्या पीठामुळे चेहऱ्याला उजळपणा येण्यास मदत होते. तसेच गुलाबजलामुळे चेहरा तजेलदार दिसू लागतो. उन्हाळ्यातील टॅनिंगवर गुलाबजल हा एक उत्तम उपाय मानला जातो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)