फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. फेसबुक व इन्स्टाची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी यासंबंधीची मोठी घोषणा केली. कंपनीच्या या निर्णयानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्राममध्ये थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद केला जाणार आहे.
आता त्याच्या जागी कम्युनिटी नोट्स नावाचा नवा प्रोग्राम सुरू होणार आहे. या नव्या प्रोग्रामद्वारे युजर्स स्वतः आपल्या कमेंट करू शकतील. हा नवीन प्रोग्राम एलन मस्क यांच्या एक्सप्रमाणे काम करेल. तसेच याची सुरुवात अमेरिकेतून केली जाईल. थर्ड पार्टी फॅक्ट चेकर्स काही पूर्वाग्रह ठेवून काम करतात. यामुळे मोठय़ा प्रमाणात कंटेंटवर परिणाम होतो, असे मेटा कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे मेटाने आता कम्युनिटी नोट्स मॉडेल स्वीकारले आहे. कम्युनिटी नोट्समुळे चुकीची माहिती असल्यास युजर्सकडून त्याची पोलखोल केली जाईल. पोस्टची पडताळणी करण्यासाठी एक किंवा दोन ऑप्शन मिळण्याची शक्यता आहे.
एक्सच्या पावलावर पाऊल
मेटाने आता एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या पावलावर पाऊल टाकले आहे. आम्ही एक्सवर हा प्रोग्राम पाहिला आहे. या ठिकाणी युजर्स स्वतः निर्णय घेऊ शकतात. कोणती पोस्ट दिशाभूल करणारी आहे, याचा निर्णय स्वतः युजर्सला घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही काही विषयांवरील निर्बंधही हटवणार आहोत, असे मेटाचे अधिकारी जोएल कॅपलन यांनी म्हटले आहे. कंपनी आता दहशतवाद, पेडोफिलिया आणि ड्रग्जसारख्या संवेदनशील प्रकरणांवर अधिक लक्ष देणार आहे, असेही ते या वेळी म्हणाले.