घरी फेस मास्क लावताना न विसरता या चुका टाळा! वाचा

त्वचेच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी फेस मास्क फारच महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु अनेक वेळा फेस मास्क वापरूनही त्वचेचा पोत मात्र सुधारत नाही.  फेस मास्क लावल्यानंतरही ग्लो येत नाही, याला नेमकी काय कारणे असू शकतात हे आपण आज पाहणार आहोत.
आपल्या प्रत्येकीला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचा तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक मार्ग अवलंबतात. चेहऱ्याच्या फेशियलपासून ते क्लीन अपपर्यंत हजारो रुपये खर्च करतात. काही कारणास्तव पार्लरमध्ये जाण्यास वेळ नसेल तर, अनेकजणी घरगुती उपचार करतात. परंतु या उपचारांचा कोणताच परीणाम होत नाही. घरच्या घरी सौंदर्यप्रसाधने वापरताना आपल्याकडून नकळतपणे काही चुका होऊ शकतात. या चुका टाळल्या तर आपणही घरच्या घरी उत्तम सौंदर्य प्राप्त करू शकतो. शिवाय घरच्या घरी सौंदर्याचे उपचार केल्यावर आपल्या खिशावरही फारसा ताण येत नाही.
फेस मास्क हा आपल्यासाठी खूपच गरजेचा आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच  चेहऱ्यावर चमक सुद्धा येते. फेस मास्क लावताना काही चुका मात्र आपण आवर्जुन टाळायलाच हव्यात. या चुका टाळल्या तर आपल्याला फेस मास्क लावणे फायदेशीर ठरू शकते.
नेहमी आपल्या त्वचेचा पोत कसा आहे हे पाहूनच चेहरा साफ करणारे स्क्रब किंवा मॉइश्चरायझर निवडावे. त्याच धर्तीवर आपल्या त्वचेच्या पोतनुसार फेस मास्कची निवड व्हायला हवी. फेसमास्क वापरण्यापूर्वी, त्वचा चांगली स्वच्छ करावी त्यानंतर फेस मास्क लावावा.
फेसमास्क लावण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा. जर तुमचे हात गलिच्छ असतील तर हातातील जंतू आणि बॅक्टेरिया यामुळे फेसमास्कचा उपयोग होणार नाही.
अनेकदा चांगले परिणाम मिळवण्यासाठी वरचेवर फेसमास्क लावले जाते. त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होते. फेसमास्क लावताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फेसमास्क जास्त काळ चेहऱ्र्यावर ठेवणेही हितावह नाही हे लक्षात घ्यायलाच हवे. अन्यथा तुमची त्वचा खराब होऊ शकते. मास्क काढल्यानंतर त्वचेला मॉइश्चराइज करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचा मऊ आणि कोमल होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)