आचारसंहिता भरारी पथकातील पाचजणांवर खंडणीचा गुन्हा

निवडणुकीसंबंधी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने ठिकठिकाणी भरारी पथके स्थापन केली आहेत. पण याच पथकातील अधिकारी व कर्मचारी धाक दाखवून लुटमार करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उल्हासनगरच्या भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी एका फूल व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 85 हजार रुपये उकळले. याप्रकरणी पाचजणांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात उल्हासनगर महापालिकेचे तीन कर्मचारी व दोन पोलिसांचा समावेश आहे.

फूल उत्पादक व्यापारी असलेले बबन आमले व त्यांचे मित्र नितीन शिंदे हे कल्याणवरून नगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फूल उत्पादनाच्या विक्रीचे पैसे देण्यासाठी जात होते. म्हारळ चौकीजवळ आचारसंहिता भरारी पथक क्रमांक सहाच्या टीमने त्यांची गाडी अडवली आणि तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे 7 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम सापडली. हे पैसे कुठून आणले ते सांगा, असे पथकातील कर्मचारी व पोलिसांनी व्यापाऱ्याला बजावले. बबन आमले यांनी फूल उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी आपण चाललो असल्याचे वारंवार सांगितले. त्यांनी फूल विक्रीसंबंधातील व्यवहाराच्या पावत्याही दाखवल्या. तरीदेखील आचारसंहिता पथकातील कर्मचाऱ्यांनी बबन आमले आणि त्यांचे मित्र नितीन शिंदे यांना गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली.

आचारसंहिता भरारी पथकातील संदीप शिरसवाल (लिपिक), संकेत चनपूर (लिपिक), आण्णासाहेब बोरुडे (मुकादम) आणि पोलीस विश्वनाथ ठाकूर व राजरत्न बुकटे यांनी व्यापाऱ्याकडून खंडणी वसूल करण्याचा कारनामा केला. त्यातील शिरसवाल, चातपूर व बोरुडे हे तिघेजण उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी आहेत. अखेर या घटनेची दखल घेत उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व आचारसंहिता पथकाचे प्रमुख सुनील लोंढे यांनी फिर्याद दाखल केली व त्यानंतर पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पालिकेचे तीन कर्मचारी; दोन पोलीस निलंबित

निवडणूक आचारसंहितेच्या काळात फूल व्यापाऱ्याकडून 85 हजार रुपयांची खंडणी उकळणारे उल्हासनगर पालिकेचे तीन कर्मचारी संदीप शिरसवाल, संकेत चनपूर, आण्णासाहेब बोरुडे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर भरारी पथकातील विश्वनाथ ठाकूर व राजरत्न बुकटे या दोन पोलिसांनादेखील निलंबित केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रत्येक तपासणी नाक्यावर चित्रीकरण करण्याचे आदेश दिले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी सांगितले.