फॉल्टी पीस देऊन दुकानदाराने केली होती फसवणूक; शिवसेनेच्या दणक्याने एसीचे पैसे परत मिळाले

ग्राहकांकडून पैसे उकळून त्यांना फॉल्टी पीसची विक्री करणाऱ्या दुकानदाराला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दणका दिला आहे. कल्याणच्या वालधुनी परिसरातील होम अप्लायन्स अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स दुकानदाराने डोंबिवलीतील एका महिलेची अशाप्रकारे फसवणूक केली होती. याप्रकरणी महिलेने तक्रार देताच शिवसैनिकांनी मुजोर दुकानदाराला धारेवर धरत जाब विचारला. त्यानंतर दुकानदाराने फसवणूक केलेले पैसे महिलेला परत दिले.

डोंबिवलीतील विद्या कांबळे-कात्रे या महिला वालधुनी येथील शान इंटरप्राईज या दुकानातून एसी खरेदीसाठी गेल्या. त्यावेळी दुकानदाराने त्यांना 30 हजार रुपयांचा एसी दाखवत तो स्टॉकमध्ये असल्याचे सांगितले. महिलेने बिल पेमेंट करताच या दुकानदाराने एसी स्टॉकमध्ये नसल्याचे कारण सांगत अरेरावी केली. जवळपास 20 दिवस एसी देण्याच्या नावाखाली या महिलेची फसवणूक केल्यानंतर महिलेने उपविधानसभा युवाधिकारी ऋतुनील पावसकर यांच्याकडे तक्रार दिली. पावसकर यांनी या दुकानदाराला जाब विचारला असता त्याने दोन दिवसात महिलेला एसी आणून दिला. मात्र महिलेने हा एसी पाहिला असता तो फॉल्टी आणि असेम्बल केलेला असल्याचे समोर आले. ही बाब ऋतुनील पावसकर यांच्या लक्षात येताच संतापलेल्या पावसकर यांनी शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रसारक तथा विभागप्रमुख प्रमोद कांबळे, उपजिल्हा संघटक नीलेश देसले यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिऱ्यांनी मुजोर दुकानदाराला फैलावर घेत महिलेची माफी मागण्यास भाग पडले. तसेच एसीसाठी भरलेले 30 हजार रुपये व फिटिंगसाठी भरलेले तीन हजार रुपये असे 33 हजार रुपये महिलेला परत मिळवून दिले.