खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतू! किसान सभेचा इशारा

शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी शिल्लक असतानाच सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रे बंद केली. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात सोयाबीन तसेच पडून आहे. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या किसान सभेने याबद्दल संताप व्यक्त केला असून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतू, असा इशारा महायुती सरकारला दिला आहे.

सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत

6 फेब्रुवारीपर्यंत होती. सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला. तसेच मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार असल्याचेही नवले म्हणाले.

सरकारने सोयाबीन खरेदी बंद केल्याने लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन पडून आहे. सरकारने हमीभावात शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बीड जिह्यातील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर अजूनही शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. सरकारने खरेदी केंद्रांची मुदत तातडीने वाढवावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, कृषिमंत्र्यांच्या घरावर सोयाबीन फेकू, असा इशारा किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.