माहुलमधील घरांसाठी 15 मेपर्यंत मुदतवाढ, कमी प्रतिसादामुळे पालिकेचा निर्णय

चेंबूरच्या माहुलमधील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेली घरे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वस्तात विकत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र माहुलची घरे स्वस्त असूनही आतापर्यंत केवळ 205 कर्मचाऱ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने या घरांच्या लॉटरीसाठी आता तिसऱ्यांदा 15 मेपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

माहुलमधील प्रकल्पबाधितांची तब्बल 9 हजार 98 घरे अजूनही रिकामी असून ही घरे पालिकेच्या सफाई पालिका कर्मचाऱ्यांना 12 लाख 60 हजार रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. मात्र एवढ्या स्वस्तात घरे उपलब्ध असतानाही आतापर्यंत केवळ महापालिकेकडे 205 ऑनलाईन अर्ज आले आहेत. दरम्यान, कमी प्रतिसादामुळे आता पालिकेकडून मुदत वाढवली गेली आहे. त्याचबरोबर यातील काही अटीही शिथील करण्यात आल्या आहेत.

माहुलच्या घरांसाठी आता अटी शिथील करण्यात आल्या आहेत. नव्या अटींनुसार, आता क्लास वन अधिकारी सोडून सर्व अधिकारी घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत तसेच पालिकेच्या कर्मचारी वसाहतींमधील कर्मचाऱ्यांनाही घरासाठी अर्ज करता येणार आहे. मात्र घर खरेदी केल्यावर कर्मचारी वसाहतीमधील घर सोडावे लागणार आहे.