दिल्लीत CRPF च्या शाळेजवळ स्फोट; आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या, रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण

राजधानी दिल्लीमधील रोहिणी जिल्ह्यात येणाऱ्या प्रशांत विहार परिसरात रविवारी सकाळी मोठा स्फोट झाला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शाळेजवळ हा स्फोट झाला. स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांच्या आणि दुकानाच्या काचाही फुटल्या असून आकाशात धुराचे लोट उठले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहिणीचे पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी या स्फोटाबाबत माहिती देताना सांगितले की, स्फोटाची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. हा स्फोट नक्की कशाचा होता याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. मात्र येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तपासानंतर सर्वकाही स्पष्ट होईल.

सीआरपीएफ शाळेजवळ सकाळच्या सुमारास स्फोट झाला. स्थानिकांनी 7 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची दोन वाहनं घटनास्थळी रवाना करण्यात आली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली असून तिथे कुठेही आग लागल्याचे किंवा इमारतीचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. जवानांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. मात्र स्फोटामुळे शाळा, घरं आणि आजूबाजूच्या गाड्यांच्या काचाही फुटल्या आहेत. सिलिंडरचा स्फोट झाला असावा अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलीस याचा तपास करत आहे.