एक्झिट पोलमध्ये एनडीए पुढे, पण इंडियाला 295 जागांची खात्री

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होताच विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सीजचे एक्झिट पोल जाहीर झाले असून त्यात एनडीएला इंडिया आघाडीच्या पुढे दाखवण्यात आले आहे. एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. त्याचवेळी इंडिया आघाडीला मात्र 295 जागा मिळण्याची खात्री असून हाच जनतेचा एक्झिट पोल आहे, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रातील निकालांत शिवसेनेच्या मशालीचे तेज पाहायला मिळणार असून महाविकास आघाडीची ताकद दिसेल असे सर्वांचेच म्हणणे आहे. महाविकास आघाडीच्या दणक्याने भाजपला किमान 20 जागांचा फटका बसेल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

धाराशिव मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना आघाडी मिळणार असल्याचे टीव्ही-9च्या एक्झीट पोलमधून समोर आले आहे. या ठिकाणी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. साताऱ्यात भाजपकडून निवडणूक लढवणारे उदयनराजे नाही तर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेच विजयी होऊन कॉलर उडवतील असा अंदाज आहे.

तामिळनाडू शतप्रतिशत इंडिया!
दक्षिणेतील तामिळनाडूत इंडियाला शतप्रतिशत यश मिळेल असा अंदाज आहे. येथे 39 जागा असून त्यात 37 ते 39 जागा इंडिया आघाडी जिंकेल असा अंदाज एबीपी-सीव्होटरने व्यक्त केला आहे. तर इंडिया टुडेने इंडिया आघाडीला 33 ते 37 जागा दाखवल्या आहेत. केरळमध्ये 20 जागांपैकी 16 जागा यूडीएफला, 5 जागा एलडीएफला तर 2 जागा मिळतील असे सर्व्हेचे म्हणणे आहे. तेलंगाणात कांटे की टक्कर आहे. तिथे इंडिया आघाडीला 17 पैकी 7 ते 9 जागा तर एनडीएलाही 7 ते 9 जागा मिळतील.

इंडिया जिंकणार हा जनतेचा सर्व्हे
इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकणार आहे. त्यापेक्षा कमी जागा येणार नाहीत. हा आमचा सर्व्हे नाही तर जनतेचाच सर्व्हे आहे. सरकारी सर्व्हे होतच असतात. त्यांच्याकडे आकडे लावण्याचे आणि बिघडवण्याचे तंत्र पहिल्यापासूनच आहे. त्यांचे मीडियातले दोस्त आकडे रंगवून सांगतात. म्हणूनच सत्य काय आहे आणि जनतेच्या मनात काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित; अजित पवारांना धक्का
टीव्ही-9 पोलस्ट्रटनुसार बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे विजयी होणार आहेत. अजित पवार गट शिरूर, रायगड आणि धाराशीव या जागाही गमावणार आहे.

ठाण्यात विचारे मिंध्यांना धूळ चारणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच धक्का बसणार असल्याचे टीव्ही 9 च्या पोलनुसार स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी शिवसेनेचे निष्ठावंत राजन विचारे हे मिंधे गटाच्या नरेश म्हस्के यांना पराभवाची धूळ चारणार आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मुसंडी
महाराष्ट्रात महाविकास आघाडी जबरदस्त मुसंडी मारेल आणि त्यात शिवसेनेच्या मशालीचे तेज पाहायला मिळेल, अस स्पष्ट झाले आहे. फोडाफोडीचे राजकारण करणाऱया भाजपला किमान 20 जागांचा फटका बसणार आहे. टीव्ही 9 च्या पोलनुसार शिवसेनेला 14, काँग्रेसला 5 आणि राष्ट्रवादीला 6 अशा महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील. भाजपला 19, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला भोपळा दाखवण्यात आला आहे. टाइम्स नाऊ नवभारत-ईटीजीच्या सर्व्हेत शिवसेना 13 ते 15, काँग्रेस 4 ते 5, राष्ट्रवादी 3 ते 4, भाजप 20 ते 22, शिंदे गट 4, अजित पवार गट 1 जागा जिंकेल असा अंदाज आहे. ऑक्सिस-माय इंडियाचा शिवसेना 9 ते 11, काँग्रेस 3 ते 4, राष्ट्रवादी 3 ते 5, भाजप 20 ते 22 असा अंदाज आहे.

अंदाज अपना अपना…
एजन्सी                 एनडीए         इंडिया       अन्य
टीव्ही 9                 346           162         35
एबीपी-सीव्होटर      353-383    152-182    4-12
इंडिया टुडे            361-401    131-166   8-20
टाइम्स नाऊ            358           152          33
सरासरी                 365           145          32