SCAM 2024! Exit Poll-Share Market वरून राहुल गांधी यांचा मोदी-शहांवर गंभीर आरोप, JPC ची करणार मागणी

निवडणूक निकालाच्या दिवशी शेअर बाजार प्रचंड वाढणार असल्याचं मोदी-शहांनी सांगितलं होतं. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्सने या विधानांना हवा दिली. पण, त्यानंतर 4 जून रोजी शेअर बाजार गडगडला. हा सगळा एक मोठा घोटाळा असून त्याची चौकशी व्हावी असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. या हजारो कोटींच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी संयुक्त संसदीय समितीची मागणीही गांधी यांनी केली आहे.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी या घोटाळ्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले की, आज आम्ही एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. आम्ही हे पहिल्यांदाच पाहिलं की निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांनी स्टॉक मार्केटवर भाष्य केलं. पंतप्रधानांनी 2-4 वेळा स्टॉक मार्केट वाढत असल्याचं म्हटलं. गृहमंत्र्यांनी सरळ म्हटलं की, 4 जून रोजी स्टॉक मार्केट वर जाईल. लोकांनी शेअर खरेदी करायला हवेत. हाच संदेश अर्थमंत्र्यांनीही दिला. त्यानंतर 1 जून रोजी माध्यमांनी खोटे एक्झिट पोल्स जाहीर केले. भाजपच्या अधिकृत सर्वेक्षणात हेच आकडे 220 दाखवत होते. गुप्तचर यंत्रणांनीही 200 ते 220 हेच आकडे सांगितले होते. 3 जून रोजी स्टॉक मार्केटने सगळे विक्रम मोडले. आणि चार जून रोजी स्टॉक मार्केट प्रचंड कोसळलं. 30 तारखेनंतर शेअर मार्केट सातत्याने उसळी घेत होतं. हे तेच लोकं आहेत ज्यांना हजारो कोटींची गुंतवणूक झाल्याचं माहीत होतं. त्यानंतर 30 लाख कोटींचं नुकसान झालं. घाऊक गुंतवणूकदारांना यात सर्वाधिक फटका पडला. हा देशातील स्टॉक मार्केटच्या इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

यावरून राहुल गांधी यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. ‘गुंतवणुकीचा सल्ला देणं हे पंतप्रधानांचं काम नसतानाही त्यांनी हा सल्ला गुंतवणूकदारांना का दिला? शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याच्या आरोपावरून सेबीच्या रडारवर आलेल्या बिझनेस ग्रुपच्या मालकीच्या मीडिया हाऊसेसनाच मोदींनी मुलाखती का दिल्या? भाजप, खोटे एक्झिट पोल्स आणि संशयास्पद विदेशी गुंतवणूकदार यांच्यात नेमका काय संबंध आहे, ज्यांनी निकालाच्या आदल्या दिवशी गुंतवणूक करून प्रचंड नफा कमावला आणि त्यांच्यामुळे 5 कोटी स्थानिक गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. हा प्रचंड मोठा घोटाळा असून आम्ही या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची मागणी करत आहोत. या सगळ्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी शेअर विकत घेण्याविषयी सांगितलं होतं. हा गुन्हा असून आम्ही याची चौकशी करण्यासाठी या समितीची मागणी करत आहोत.’ असं राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे.