![bhimabai jondhale](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/bhimabai-jondhale-696x447.jpg)
>> प्रज्ञा सदावर्ते
‘मोबाईल बाजूला ठेवून पुस्तकांच्या जगात डोकवा, बघा… ती तुमच्याशी बोलतील, तुम्हाला जगणं शिकवतील,’ असा प्रेमळ सल्ला देत भीमाबाई जोंधळे यांनी वाचनासोबतच आत्मभान जागवणारी एक चळवळ उभी केली आहे, त्याचं केंद्र झालं मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिकजवळचं दहावा मैल येथील आजीचं पुस्तकांचं हॉटेल.
भाषा, वाचन संस्कृतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना शासनाचा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी दै. ‘सामना’शी बोलताना आपला इथपर्यंतचा प्रवास उलगडला. ‘या बाळांनो… आजीची माया अन् पुस्तकांची दुनिया तुमची वाट बघतेय!’, अशी सादही सर्वांना घातली. भीमाबाई जोंधळे यांनी ‘सामना’शी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि ‘पुस्तकांची आई’ कशी घडली ते उलगडवून सांगितले…
‘‘अनेक नामवंत साहित्यिक व वाचकांनी आवर्जून हॉटेलला भेट दिली. तेच पुस्तकांची आई म्हणू लागले. आतापर्यंत कामाची दखल घेऊन नव्वदहून अधिक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मान केला. आता शासनाचा भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झाला, हा आनंद आहेच. पुस्तकांमुळे मला अनेकांकडून आई, आजी म्हणून प्रेम मिळाले, हा आनंद त्याहून मोठा आहे.’’
वाचन, लेखनाची आवड कशी निर्माण झाली?
– इच्छा असूनही माझं शिक्षण इयत्ता पाचवीतच थांबलं, तेव्हाच वडिलांनी वयाच्या अकराव्या वर्षी लग्न लावून दिलं. सासरीही गरिबीच होती. घरातल्या कामाच्या गराडय़ात वाचनाची आवड कधी जोपासता आली नाही. त्यातच शेती तोट्यात असल्यानं मी व मुलगा प्रवीणनं वृत्तपत्रं विक्रीचं काम सुरू केलं. याच वृत्तपत्रांनी मला जग दाखवलं, त्यामुळे माणसं कळू लागली. वाचनाची गोडी इतकी होती की, आजही शाळेतल्या कविता तोंडपाठ आहेत. वाचलं की थोडंफार लिहूनही ठेवते. रोज पहाटे हॉटेलवर आल्यानंतर पहिले वृत्तपत्रं वाचते. वडिलांनी तेव्हा शिकवलं असतं तर शिक्षिका झाले असते.
पुस्तकांचं हॉटेल असावं, हे सुचलं कसं?
– मी वयाच्या साठीपर्यंत शेती केली. संघर्ष आणि कष्टातून दोन्ही मुलांना शिकवले. कंपन्यांच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे जऊळके दिंडोरीतील तीन एकर जमीन नापीक झाली आणि पोटा-पाण्यासाठी सन 2010 मध्ये दहावा मैल येथे चहाची टपरी सुरू केली. सुरुवातीला लोकांनी वाचावं म्हणून टपरीजवळच वृत्तपत्रांचा स्टँड ठेवायचे. पुढे छोटं हॉटेल सुरू केलं, तेव्हा आलेला प्रत्येक ग्राहक पदार्थ येईपर्यंत मोबाईलमध्ये गुंग असायचा, हे मला खूप खटकायचं म्हणूनच मुलगा प्रवीण याच्याकडे मी टेबलावर पुस्तकांच्या टोकऱया ठेवण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्याचा परिणामही लगेचच दिसू लागला.
ग्राहकांचा या आगळ्यावेगळ्या हॉटेलला कसा प्रतिसाद आहे?
– सुरुवातीला काही जवळच्याच लोकांनी नाकं मुरडली, पण माझा उद्देश वाचनाकडे मुलांना वळवणं हाच होता म्हणून मी थांबले नाही. येणाऱया प्रत्येकाशी मी गप्पा मारते. मेन्यूकार्ड बघितल्यानंतर टेबलावरच्या पाटीवर पेन्सिलीने कुठले खाद्यपदार्थ हवेत ते लिहायला सांगते. ऑर्डर येईपर्यंत लहान-मोठे सगळेच टेबलावरच्या नाही तर इतरही आवडत्या पुस्तकांत रमतात, हे बघून सर्वाधिक आनंद होतो.
‘आजीच्या पुस्तकांचं हॉटेल’ची वैशिष्टय़े काय आहेत?
– येथे चविष्ट पदार्थासोबत पुस्तकांची शिदोरी देते. पाच हजारांहून अधिक पुस्तके वाचायला ठेवली आहेत. अक्षरबाग, कवितेची भिंत, अमृतवेल, मृद्गंध वाचनकट्टा, ज्ञानाचे प्रकाशदिवे हे खास दालन तयार केले आहेत. स्वत:च्या हातानं पिठलं भाकरीसह इतरही पदार्थ तयार करून वाढते. वाचत राहा, असं सांगून हातात पुस्तक देते.
सर्वात मोठे समाधान काय वाटते?
– रोजच पहाटे साडेपाचपासून रात्री साडेदहापर्यंत मी पुस्तकं आणि हॉटेलच्या या जगात असते. आता मी 75 वर्षांची आहे, पण इथे अजिबात थकत नाही. राज्यभरातून कार्यक्रमांना प्रमुख पाहुणी म्हणून लोक बोलवायला लागले आहेत. वाचन करा म्हणणारी माझ्यासारखी ग्रामीण भागातील आजी मुलांना आवडते, हीच माझ्यासाठी समाधान देणारी मोठी गोष्ट आहे.