
>> प्रभा कुडके, विशेष प्रतिनिधी
जम्मू-कश्मिरात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. याचा सर्वात मोठा फटका जम्मू-काश्मीरमधील पर्यटन उद्योग आणि त्यासंबंधित उद्योग-व्यवसायांना बसला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे या व्यावसायिकांचे किती नुकसान होणार आहे? तसेच कश्मीरची प्रतिमा मलिन होत आहे याबाबत कॅब चालकाने खेद व्यक्त केला. जम्मू-कश्मीर हे राज्य आदरातिथ्य, पाहुणचार याबाबत प्रसिद्ध होतो, मात्र या दहशतवादी कृत्याने प्रतिमा मलिन होत आहे. कोणत्याही धर्मात अशा प्रकारच्या हिंसाचाराला थारा नाही, तसेच कश्मिरीही या दहशतवाद्यांचे समर्थन करणार नाही, असे कॅब चालक हारिस खान याने ‘दै. सामना’शी बोलताना स्पष्ट केले.
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधील पर्यटक घरी परतत आहेत. तसेच अनेकांनी आपले बुकिंगही रद्द केले आहे. याचा थेट फटका पर्यटनाशी संबंधित उद्योग- व्यवसायांना बसत आहे. याबाबत बोलताना हारिस म्हणाला की, पर्यटक नक्कीच कमी झाले आहेत. ही घटना घडल्यापासून माझ्या आईने, बहिणीने, भावानेही काही खाल्लेले नाही. मृत्यू अंतिम सत्य आहे, प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे. पण या दहशतवादी कृत्यामुळे कश्मिरींचे नाव बदनाम झाले. आम्ही कितीही आदरातिथ्य, पाहुणचार केला तरी सगळे पूर्वीसारखे होणार नाही. आज कश्मिरी विद्यार्थ्यांनाही मारहाण केली जात आहे. हा दहशतवादी हल्ला झाला नसता तर देशभरात आमची इज्जत राहिली असती. 2019 नंतर आम्ही चांगले नागरिक, राष्ट्रभक्त होण्याचा खूप प्रयत्न केला. पण अशी दहशतवादी लोक कुठून येतात आणि आमच्या इज्जतीचा कचरा करून जातात माहिती नाही.
तो पुढे म्हणाला की, विमानतळावर फक्त जाणारे लोक दिसत आहेत. विमानतळाबाहेर येताना कुणीही दिसत नाही. आपलीच जमीन, आपलाच देश, आपल्याच लोकांना सोडून सगळे माघारी चालले आहे. देशातील कोणत्याही राज्यात तुम्हाला एवढे आदरातिथ्य मिळणार नाही, तेवढे आम्ही केले. पण एक घटना घडली अन्…. ही घटना घडल्यापासून माझी आजी जेवलीही नाही.
जुने जाणते लोक म्हणतात, 1947 पासून पहिल्यांदाच हिंदुस्थानच्या बाजुने कश्मीरने बंद पाळला. अलगाववादी, हुर्रियत, राजकारणी सगळ्यांनी बंदला समर्थन दिले. आम्ही एकच झेंडा, एकच संविधान मानतो. आमच्यावर विश्वास ठेवा. या दहशतवादी कृत्यात आमचा सहभाग नाही. देशभरातली लोकांनी कश्मिरात यावे, आणि आम्हाला आदरातिथ्याची संधी द्यावी, असेही तो म्हणाला.
आमचीही इच्छा आहे की या भ्याड हल्ल्यात जे लोक सहभागी आहेत त्यांना यमसदनी धाडावे. या दहशतवादी कृत्यात एखाद्या कश्मिरीचा सहभागा असेल तर कायदा तर त्याला शिक्षा देईलच, पण त्याआधी आम्ही कश्मिरी त्याला लाल चौकात घंटाघरात फाशी देऊ, असेही हारिस खान म्हणाला.