
मुंबई विद्यापीठाच्या एलएलबीच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मंगळवारी मनस्तापाला सामोरे जावे लागले. या प्रकारामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
विधी शाखेच्या तिसऱ्या वर्षातील पाचव्या सत्रातील लेबर लॉ अॅण्ड इंडस्ट्रिअल रिलेशन्स – टू या विषयाच्या परीक्षेचे आयोजन सकाळी 10.30 वाजता करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित तब्बल 60 महाविद्यालयांमध्ये या परीक्षेचे आयोजन केले होते. या महाविद्यालयातील सुमारे 10 हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यांना प्रश्नपत्रिकेचे वाटप करण्यात आले. मात्र ही प्रश्नपत्रिका जुन्या अभ्यासक्रमावर आधारलेली असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर पुठे विद्यापीठाच्या हा गोंधळ लक्षात आला. सुधारित प्रश्नपत्रिका लिंकद्वारे महाविद्यालयांना पाठवली. विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढवून देण्यास महाविद्यालयांना सांगण्यात आले. त्यानंतर ही परीक्षा पार पडल्याचा खुलासा विद्यापीठाने केला.
परीक्षा नियंत्रकांच्या राजीनाम्याची युवासेनेची मागणी
मुंबई विद्यापीठ परीक्षा विभाग आणि आयडॉल यांच्या गलथान कारभारावरून गेले दीड वर्ष युवासेना सिनेट सदस्यांकडून सातत्याने संयुक्त सभेची मागणी होत आहे. परंतु विद्यापीठ प्रशासन ठेंगा दाखवते आहे. आजही परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर परीक्षा विभागाचा घोळ लक्षात आला. परीक्षा विभागाची गोंधळाची मालिका सुरूच आहे. किमान आता तरी नैतिकतेची जबाबदारी घेऊन संचालक,परीक्षा नियंत्रक राजीनामा देणार का, असा सवाल युवासेना सनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे.