
>> डॉ. अ. ल. देशमुख
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच एक परिपत्रक काढून यंदाच्या शालेय परीक्षा 26 एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत, असा निर्णय घेण्यात आल्याचे कळवले आहे. वास्तविक गेली 20 वर्षे द्वितीय सत्राच्या परीक्षा 10 ते 12 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार ही विद्यार्थ्यांना सवय लागलेली आहे. ती योग्य आहे का अयोग्य आहे या विचारापेक्षा विद्यार्थ्यांची मानसिकता आपल्याला 14 एप्रिलपासून सुट्टी आहे ही तयार झालेली आहे. त्याप्रमाणे सुट्टीचे नियोजन केलेले आहे. अनेक पालकांचे पर्यटनस्थळांचे बुकिंग झालेले आहे. पण या निर्णयाने यावर पाणी पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थी नाराज होणार आहेत. अशा नाराज अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका लिहाव्या लागतील, हे कितपत योग्य आहे?
महाराष्ट्र शासनाने द्वितीय सत्र परीक्षेच्या संदर्भात एक परिपत्रक काढलेले आहे. हे परिपत्रक 10-11 मार्च रोजी सर्व शाळांमध्ये पांमित झालेले आहे. पण या परिपत्रकामुळे राज्यातील समस्त पालकवर्ग आणि विद्यार्थीवर्ग चिंतेत पडला आहे. याचे कारण म्हणजे, राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या द्वितीय सत्र परीक्षा साधारणपणे मार्चअखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळा स्तरावरून घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. यावर उपाय म्हणून शासनाने या वर्षी इयत्ता पहिली ते नववीच्या द्वितीय सत्र परीक्षा 8 एप्रिलला सुरू करून 24 एप्रिलपर्यंत घ्याव्यात असे सुचवलेले आहे. शासनाच्या या निर्णयास काही विरोध नाही; परंतु हा निर्णय अचानकपणे आणि एवढय़ा उशिरा घेतल्यामुळे सबंध शिक्षण क्षेत्रामध्ये एक गोंधळाचे वातावरण निर्माण होणार आहे, याचा विचार शासनाने केलेला दिसत नाही.
गेली 25 वर्षे राज्यातील सर्व शाळा द्वितीय सत्र परीक्षा मार्चच्या अखेरीस सुरू करून 10 एप्रिलपर्यंत संपवतात. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी व निकाल लावणे यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळतो. 10 एप्रिलपासून विद्यार्थी घरी असतात. त्यामुळे पालक त्यानुसार मुलांच्या सुटय़ांचे नियोजन करतात. असे असताना शासनाच्या या तडकाफडकी आणि उशिरा जाहीर केलेल्या निर्णयामुळे कोणकोणते गोंधळ झालेले आहेत ते सविस्तरपणे पाहिल्यास आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की, हे परिपत्रक कसे चुकीचे आहे.
पालक – विद्यार्थी 12 ते 13 एप्रिलपासून सुट्टीवर असतात असे गृहीत धरून अनेक पालक पर्यटनाला जाण्यासाठी रेल्वेचे, विमानाचे व पर्यटनस्थळांचे बुकिंग करून ठेवतात. याही वर्षी अनेक पालकांनी अशा प्रकारचे बुकिंग केलेले आहे. पर्यटनाला जाण्याप्रमाणे काही पालकांनी कौटुंबिक कार्पामाचे नियोजन केलेले असते. यामध्ये लग्न, साखरपुडा, मुंज, काही धार्मिक कार्पाम असे निर्णय घेतलेले असतात. काही पालकांनी आपल्या मुलाला खासगी शिबिरामध्ये प्रवेश घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही केलेली असते. दरवर्षी 1 मे रोजी शाळांचे निकाल लागतात. त्यामुळे 10 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थी या सर्व कार्पामांमध्ये गुंतलेले असतात. आता 24-25 एप्रिलपर्यंत परीक्षाच असेल तर वरील सर्व नियोजनाचे काय करायचे, असा प्रश्न समस्त पालकवर्गाला पडला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पालकांच्या मनामध्ये शासनाविषयी नकारात्मक भूमिका तयार झालेली आहे. शासनाने हेच परिपत्रक जर तीन-चार महिने आधी काढले असते तर हा गोंधळ झाला नसता.
दहावीची पूर्वतयारी – या वर्षीपासून दहावीच्या परीक्षा 15 दिवस अलीकडे आलेल्या आहेत. म्हणजे 15 फेब्रुवारीपासूनच सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे दहावीला शिकवायला कमी दिवस मिळणार आहेत. हा विचार करून बहुसंख्य शाळांनी 5 एप्रिलपर्यंत नववीच्या द्वितीय सत्र परीक्षा पूर्ण करायच्या आणि 6 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत दहावीचे वर्ग सुरू करायचे जेणेकरून दहावीच्या विद्यार्थ्यांना पुरेसा न्याय देता येईल व त्यांची पुरेशी तयारी करून घेता येईल. त्यांची पूर्वतयारी उत्तम करता येईल या सद्भावनेने जवळजवळ 90 टक्के शाळांनी नियोजन केलेले आहे. शाळांनी घेतलेला हा निर्णय खरोखर योग्य आहे. कारण त्यामुळे दहावीचा काही पोर्शन या 30 दिवसांमध्ये घेता येईल हा त्यातला सकारात्मक विचार आहे. आता शासनाच्या ताज्या निर्णयामुळे या नियोजनाचं काय करायचं?
मूल्यमापन प्रक्रिया – द्वितीय सत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी व त्यानंतर वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गाचा रिझल्ट तयार करणे हे शाळेमधील अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि ते अत्यंत गुंतागुंतीचंही आहे. या कामांमध्ये अगदी शुल्लक चूकसुद्धा करून चालत नाही. असे असताना 24 एप्रिलला जर परीक्षा संपली तर सहा दिवसांमध्ये उत्तरपत्रिका तपासणी आणि रिझल्ट लावणे हे दिव्य कसे पार पाडता येईल? अगदी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला तरीही हे होणार नाही. ज्या विषयाचा पेपर 24 तारखेला आहे त्याविषयी शिक्षकाला पाच ते सहा गठ्ठे तपासायला येतात. वर्गामध्ये सरासरी 50 ते 55 विद्यार्थी असतील तर त्या शिक्षकाने 24 तास उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले तरीसुद्धा उत्तरपत्रिका तपासून होणार नाहीत हे वास्तव आहे. याचा काही विचार शासनाने केला आहे किंवा नाही हेच समजत नाही.
उत्तरपत्रिका तपासून झाल्यानंतर रिझल्ट लावण्याची प्रक्रिया आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. रिझल्ट हा केवळ द्वितीय सत्र परीक्षेचा नसतो तर तो संपूर्ण वर्षाचा संकलित असतो. त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व वर्षाचे अवलोकन करून रिझल्ट तयार करण्याचे काम वर्गशिक्षकाला करावे लागते. हे काम करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तीन ते चार दिवस लागतात. रिझल्ट तयार करणे एवढेच काम नाही तर त्याप्रमाणे प्रगती पुस्तक भरणे हेही काम करावे लागते. आजही काही शाळांमध्ये एकेका वर्गामध्ये 70 ते 75 विद्यार्थी आहेत. त्या शाळांच्या वर्ग शिक्षकांनी रिझल्ट लावणे आणि प्रगतीपत्रक भरणे हे कधी करायचं हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांसमोर आ वासून उभा आहे. यासंबंधी शासनाने मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
आरोग्य – सध्या मार्च महिना सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज घेतल्यास असे जाणवते की महाराष्ट्राचे सरासरी तापमान 38 ते 41 डिग्री सेंटिग्रेड आहे. ही मार्च महिन्यातली परिस्थिती आहे. एप्रिल महिन्यामध्ये हेच तापमान 42 ते 45 डिग्री सेंटिग्रेडपर्यंत जाईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अशा तापमानात जर परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील असे वाटते. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता सर्वात महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने परीक्षेला जावे असे सर्व शिक्षण क्षेत्रात म्हटलेलं आहे. 42 डिग्री सेंटिग्रेड तापमानामध्ये कोणताही विद्यार्थी आनंदाने बसू शकणार नाही हे सत्य आहे. महाराष्ट्रातल्या काही शाळांमध्ये आजही छतावर पत्रे आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी तीन तास कसा बसेल याचा विचार शासनाने केला आहे किंवा नाही, हे समजण्यास मार्ग नाही.
संकलित मूल्यमापन व पॅट चाचण्या – महाराष्ट्रातल्या मुलांची गुणवत्ता तपासायची म्हणून शासनाने इयत्ता पहिली ते आठवी या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांच्या संकलित चाचण्या व नियतकालिक मूल्यमापन याही परीक्षा याच काळात जाहीर केलेल्या आहेत. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही शिक्षकांनीच करायचे आहे. या परीक्षेचे मूल्यमापनही शिक्षकांनीच करायचे आहे. शाळेच्या परीक्षा, शासनाच्या परीक्षा, संकलित चाचण्या, संकलित मूल्यमापन, पॅट चाचण्या अशा परीक्षांचा भडीमार विद्यार्थ्यांच्या मनावर झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर तर परिणाम झालेला आहेच; पण शिक्षकही नाखूश आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही नाखूश असतील तर त्या शिक्षणात काय अर्थ आहे, याचा विचार शासनाने करण्याची गरज आहे.
शासनाचा कदाचित अंदाज चुकलेला असू शकतो किंवा अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा हा शासनाचा विचारही योग्य आहे. परंतु तो पुढील वर्षीपासून कार्यरत आणावा असे सुचवावेसे वाटते. या वर्षी दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणेच सर्व शाळांनी काम करावे असा आदेश शासनाने मन मोठे करून घ्यायला हवा. पालक, शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक, सामाजिक घटक या सर्वांनाच त्यातून न्याय मिळेल. कुठेही आम्ही माघार घेतोय असा नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करावा, असे सुचवावेसे वाटते.
(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आहेत)