Imran Khan – इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरुंगवास, पत्नी बुशरा बिबीलाही अटक करण्याचे आदेश

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-एक-इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने अल-कादिर ट्रस्टच्या भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. याच प्रकरणात त्यांची पत्नी बुशरा बिबी हिलाही दोषी ठरवण्यात आले असून तिला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात इम्रान खान यांनी झेलम जिल्ह्यात अल-कादीर ट्रस्टला 53 कोटींची सरकारी जमीन दिली. ही ट्रस्ट इम्रान आणि त्यांची पत्नी बुशारा बिबी यांची आहे. या प्रकरणी पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरोने डिसेंबर 2023 मध्ये इम्रान खान, त्यांची पत्नी आणि अन्य सहा जणांविरुद्ध 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

हा जमीन घोटाळा जवळपास 190 मिलियन पौंडचा असून याच प्रकरणात आता इम्रान खान यांना दोषी ठरवत 14 वर्षाची शिक्षा आणि बुशरा बिबीला 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच इम्रान खानला 1 मिलियन पाकिस्तानी रुपये आणि बुशरा बिबीला 5 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातील इतर आरोपी पाकिस्तानबाहेर असल्याने त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिली आहे.