माजी खासदार हिना गावित यांनी भाजपमधून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. हिना गावित यांना अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण ही जागा मिंधे गटाला गेल्याने गावित यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
2014 साली पहिल्यांदा हिना गावित या भाजपच्या तिकिटीवर खासदार झाल्या होत्या. दोन टर्म खासदार राहिलेल्या गावित यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारापुढे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर अक्कलकुवा मतदारसंघातून त्या इच्छूक होत्या. पण महायुतीत हा मतदारसंघ मिंधे गटाकडे गेला. या जागेवरून मिंधे गटाकडून आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर हिना गावित यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तरी गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. आज गावित यांनी पक्षाच्या प्रवक्ते पदाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. गावित यांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपला चांगलाच फटका बसला आहे.