भाजपच्या माजी आमदाराला धमकी देत 1 कोटीच्या खंडणीची मागणी; कोतवाली पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल

अश्लील व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करीत, ‘तुमची राजकीय करकीर्द संपवून टाकू,’ अशी धमकी देत भाजपचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी दोन महिलांसह एका तथाकथित पत्रकारावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माजी आमदार धोंडे यांनी तक्रार दिली.

कल्पना सुधीर गायकवाड हिच्यासह अन्य एक महिला बांगर (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) आणि तथाकथित पत्रकार इस्माईल दर्यानी ऊर्फ भैया बॉक्सर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भैया बॉक्सर याने माजी आमदारांच्या पीएकडून सुमारे 25 हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

माजी आमदार धोंडे यांना जानेवारी महिन्यात आष्टी येथील संपर्क कार्यालयात बांगर नावाची महिला भेटली होती. कल्पना गायकवाड हिने पाठविल्याचे सांगत, ‘तुमची अश्लील व्हिडीओ क्लिप माझ्याकडे असून, ती कल्पना गायकवाडने मला दिली आहे. ही क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करायची नसेल, तर कल्पना मॅडमसाठी तुम्ही माझ्याकडे एक कोटी रुपये द्या; नाहीतर ती तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहे,’ असे तिने सांगितले. ‘तुमचा निर्णय तातडीने कळवा,’ असे सांगत ती निघून गेली. त्यानंतर काही दिवसांनी तिचा फोनही आला होता. त्यानंतर 18 फेबुवारीला कल्पना गायकवाडचा फोन आला. तिनेही क्लिप व्हायरल करून बलात्काराचा गुन्हा दाखल करून राजकीय करीअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देत एक कोटी रुपये मागितले. त्यानंतर या दोघींविरोधात आष्टी पोलिसांत तक्रार अर्ज दिला. याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या महिलांनी संपर्क करण्याचे बंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, 11 मे 2024 रोजी नगर येथील ‘टाइम्स ऑफ नगर’ या वेबपोर्टलचा पत्रकार इस्माईल दर्यानी ऊर्फ भैया बॉक्सर याने माझ्या नावाने ‘त्या महिलेला ठार मारण्याची व कुटुंबाला उचलून नेण्याची धमकी दिली,’ अशा आशयाची बातमी प्रसारित केली. याबाबत माझे पीए जफर शेख यांनी विचारण केली असता, पत्रकाराने बातमी डिलीट केली. त्यानंतर पत्रकाराने 14 मे रोजी नगर येथे आमची भेट घेऊन, ‘हे प्रकरण आर्थिक देवाण-घेवाण करून मिटवून टाकू. कल्पना गायकवाड माझ्या संपर्कात असून, मी सेटलमेंट करून देतो. महिलेने एक कोटी मागितले आहेत; पण तडजोड करून प्रकरण मिटवू. मला काहीतरी द्या,’ असे त्याने सांगितले. त्यानंतर पीए शेख यांच्याकडून त्याने 25 हजार रुपये घेतले, असे माजी आमदार धोंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.