तुमची अश्लिल व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत भाजपच्या माजी आमदाराला 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार नगरमध्ये घडला आहे. माजी आमदार भिमराव आनंदराव धोंडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. यानंतर कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी कल्पना सुधीर गायकवाड, बांगर नावाची महिला (पूर्ण नाव माहिती नाही) आणि तथाकथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भैय्या बॉक्सर याने माजी आमदारांच्या पीएकडून 25 हजार रुपये घेतल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी महिन्यात भाजपचे माजी आमदार भिमराव आनंदराव धोंडे आष्टी येथील संपर्क कार्यालयात लोकांना भेटण्यासाठी आले. यावेळी बांगर नावाची महिला येथे आली आणि मला कल्पना गायकवाड मॅडमने पाठवल्याचे सांगत खासगीत बोलायचे असे म्हटले. यावेळी तिने माझ्याकडे तुमची एक अश्लिल क्लीप असून ती व्हायरल करायची धमकी देत 1 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. तसे न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
त्यानंतर फेब्रुवारी 2024मध्ये कल्पना गायकवाड या महिलेने मेसेज पाठवला आणि तुमची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करेन, तुमचे राजकीय करिअर उध्वस्त करेन अशी धमकी देत 1 कोटी रुपये मागितले. याविरोधात माजी आमदार भिमराव आनंदराव धोंडे यांनी आष्टी पोलीस स्थानकात तक्रारही दिली होती. पोलीस चौकशीनंतर बांगर आणि कल्पना गायकवाड या महिलांना संपर्क करण्याचे बंद केले.
दरम्यान, 11 मे 2024 रोजी आष्टी येथे राजकीय कार्यक्रमात असताना नगर येथील ‘टाईम्स ऑफ अहमदनगर’ या वेब पोर्टलचा पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर याने माझ्या नावाने त्या महिलेला जिवे मारण्याची आणि कुटुंबाला उचलून नेण्याची धमकी दिल्याची बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी खोटी असल्याचा फोन पीए जफर शेख याने सदर पत्रकाराला केला. त्यानंतर त्याने ती डीलिट केली. मात्र 14 मे 2024 रोजी पीए जफर शेख यांना पत्रकाराने फोन करत माझ्याशी बोलण्याची विनंती केली. यानंतर मुंबईकडे मार्गस्थ होत असताना त्याने संपर्क साधत हे प्रकरण आर्थिक देवाण घेवाण करून मिटवून टाकू म्हटले.
कल्पना गायकवाड या महिलेकडे अश्लिल क्लीप असून ती महिला माझ्या संपर्कात असल्याचे सदर पत्रकाराने पीएला सांगितले. यानंतर पीए जफर शेख याने शहानिशा माझ्या उपरोक्ष त्याला 25 हजार रुपये दिले. मात्र याबाबत कळताच मी पीएला याचा जाबही विचारला. त्यानंतर सदर पत्रकाराने वारंवार फोन केला, मात्र आम्ही प्रतिसाद दिला नाही. त्याने वेब पोर्टलवर कल्पना गायकवाड या महिलेला हाताशी धरत माझ्याविरुद्ध खोटी बातमी लावली आणि बदनामी केली, अशी तक्रार माजी आमदारांनी केली आहे. यानंतर कोतवाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.