
मिंधे सरकारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सरकारलाच टोपी लावली आहे. मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर असल्याचे भासवून कोटय़वधींचे शासकीय अनुदान सत्तार यांनी लाटले. विशेष म्हणजे, त्या निधीची स्वतःशीच संबंधित शाळांवर खैरात केली. सत्तार यांचा हा भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारातून उघड झाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री असताना शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप केला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीचा आधार त्यांनी दिला आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेंतर्गत 2015पासून 2 लाख रुपये वार्षिक अनुदान दिले जात होते. 4 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरीही तसा प्रस्ताव मंजूर झाल्याचे भासवून 7 ऑक्टोबर रोजी अनुदान 10 लाख रुपयांपर्यंत वाढवले गेले आणि छत्रपती संभाजीनगरमधील 16 शाळांना मंजूरही करण्यात आले. या सर्वच्या सर्व शाळांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण तब्बल 1 कोटी 60 लाख रुपये अनुदान मंजूर करून वितरीत करण्यात आले.
अल्पसंख्याक विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत
या सर्व शाळा सत्तार यांच्याशी संबंधित होत्या असा दावा कुंभार यांनी केला आहे. हे अनुदान द्यायचे झाल्यास प्रशासनाकडून नियम, कायद्याकडे बोट दाखवून अनेक महिने रखडवले जाते. अब्दुल सत्तार यांच्यासाठी मात्र अल्पसंख्याक विभागातील अधिकाऱयांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी अवघ्या सहा दिवसांत प्रक्रिया पूर्ण केली. अधिकाऱयांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱयांवरही कारवाई करावी, अशी मागणी पुंभार यांनी केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील याच त्या शाळा
- प्रगती उर्दू प्राथमिक शाळा, उंडणगाव
- उर्दू प्राथमिक शाळा, जंनाळा
- उर्दू प्राथमिक शाळा, नानेगाव
- इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळ, फर्दापूर
- नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा, अंधारी
- नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा, भराडी
- नॅशनल उर्दू प्राथमिका शाळा, केऱहाळी
- उर्दू प्राथमिक शाळा, चारनेर
- नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा, पिंपळदरी
- नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा, इदगाह परिसर
- हिंदुस्तान उर्दू प्राथमिक शाळा, अंधारी
- नॅशनल उर्दू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जमालशा कॉलनी, सिल्लोड
- नॅशनल मराठी हायस्कूल, डोंगरगाव
- हिंदुस्तान उर्दू हायस्कूल, अंधारी
- नॅशनल उर्दू हायस्कूल, अजिंठा
- दयानंद विद्यालय, घटांची