Hemant Soren grants bail : हेमंत सोरेन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दिलासा मिळाला आहे. अंचल जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने सोरेन यांना जामीन मंजूर केला आहे.

हेमंत सोरेन यांच्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्यासमोर तीन दिवस चर्चा आणि सुनावणी झाली. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 13 जून रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने आज याबाबत आपला फैसला सुनावत सोरेन यांना जामीन मंजूर केला.

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेते सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सध्या ते रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात बंद आहेत. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जामीन मंजूर झाल्याने झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात नवचैतन्य संचारले आहे.

149 दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला!

झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित खटल्यात तुरुंगवास भोगावा लागला. 149 दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला. सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे. एनडीए सरकारकडे आमची मागणी राहील, की सूड भावनेने कोणतीही कारवाई न होता संविधानानुसार लोकशाहीची भरभराट होईल अशी कामगिरी करावी. सत्यमेव जयते! असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.