मोदींनी मणिपूरचा दौरा न केल्याने लोक दुःखी, माजी राज्यपाल अनुसुइया उइके यांचे विधान चर्चेत

गेल्या वर्षी मे महिन्यापासून मणिपूर धुमसत आहे. या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक लोक ठार झाले असून हजारो लोक बेघर झाले आहेत. परंतु इतके होऊनही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्याप मणिपूरला गेले नाहीत. त्यामुळे मणिपूर राज्यातील लोक प्रचंड दुःखी आहेत, असे मोठे विधान मणिपूरच्या माजी राज्यपाल अनुसुइया यांनी केले.

मणिपुरातील परिस्थिती कधी नियंत्रणात येते, तर कधी त्या ठिकाणी पुन्हा हिंसाचार उफाळून येतो. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी या दोन समाजांत हिंसाचार वाढत चालला आहे. मी या ठिकाणी मदत केंद्राला भेट दिली आहे. दोन्ही समाजांतील लोकांच्या भेटीसुद्धा घेतल्या आहेत. मणिपुरातील नव्या हिंसाचाराच्या घटनेवरून मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. ज्या वेळी मणिपुरात हिंसाचार उफाळला होता, त्या वेळची परिस्थिती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जो निर्णय घेतला त्याची मला काही सविस्तर माहिती नाही. मणिपूर प्रकरणात केंद्र सरकार दखल देत आहे का? या प्रश्नावर बोलताना अनुसुइया यांनी म्हटले की, हा दोन समाजांतील संघर्ष आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण मला दिसत नाही. मी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भेटले. मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी हिंसाचारानंतर कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे राज्यातील हिंसाचार आणखी उफाळला, असेही त्या या वेळी म्हणाल्या.