
पूजा करताना ओढणी निरंजनावर पडून आग लागल्याने माजी केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास जखमी भाजल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
गिरिजा व्यास सोमवारी त्यांच्या उदयपूर स्थित घरी गणगौर पूजा करत होत्या. यावेळी त्यांची ओढणी पेटत्या निरंजनावर पडली आणि ओढणीने पेट घेतला. यात गिरिजा व्यास भाजल्या. घरातील नोकराने आग लागल्याचे पाहताच तात्काळ व्यास यांच्या दिशेने धाव घेतली.
व्यास यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून अहमदाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले. व्यास या भाजल्याचे कळताच त्यांचे भाऊ गोपाळ शर्मा यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या गिरिजा व्यास यांनी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. त्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील राहिल्या आहेत. गिरीजा व्यास यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे.