विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’मध्ये मोठा गोलमाल करून राज्यात महायुती सत्तेवर आली. यावरून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 23 जानेवारीला जानकर हे दिल्लीत निवडणूक आयोगाकडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. तसेच यावेळी माजी आमदार बच्चू कडू हेही त्यांच्या सोबत असणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने माळशिरस मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 जानेवारीपासून जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशाराही जानकर यांनी दिला आहे.
यासंदर्भात आमदार उत्तम जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली. ईव्हीएम मुद्दय़ाला मारकडवाडी गावातून सुरुवात झाली आणि तोच आक्रोश सर्वत्र आहे. आता माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात काल ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी 1206 लोकांनी हात वरती करून मला मतदान केले. पण त्या गावात विधानसभा निवडणुकीत मला 963 एवढीच मते दाखविण्यात आली. आता धानोरे गावातील 1200 आणि मारकडवाडीतील 1466 ग्रामस्थांनी प्रतिज्ञापत्रे देऊन निवडणूक आयोगाकडे मतदानाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
जंतरमंतरवर आंदोलन
ईव्हीएमचा मुद्दा देशव्यापी आहे. दिल्लीतही विधानसभा निवडणुका सुरू आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आपचे नेते, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भूमिका निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत अशी आहे. तेही आंदोलनात सहभागी होतील असे जानकर म्हणाले.