
ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे. त्यांचा 23 फेब्रुवारीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यात त्यांनी ईव्हीएम मशीनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मशीन मतदानासाठी योग्य नाहीतच. बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत, असे ट्रम्प या व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. या व्हिडीओची आता संपूर्ण जगभरात चर्चा होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनीही हा व्हिडीओ शेअर करत मोदींवर जोरदार टीका केली आहे.
बॅलेट पेपर हेच निवडणुकीसाठी सर्वात सुरक्षित माध्यम असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प पुढे म्हणाले, एलॉन मस्क यांनीच मशीन मतदानासाठी बनवण्यात आलेल्या नाहीत. मशीन यासाठी योग्य नाहीत, असे मला स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच एमआयटीच्या एका प्राध्यापकानेही निवडणुकांसाठी बॅलेट पेपरच योग्य आहे, असे म्हटल्याचे ट्रम्प सांगताना दिसत आहेत. तब्बल एक तास आणि 13 मिनिटांचे हे भाषण असून त्यातील 44 सेकंदांची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
सुरक्षिततेसाठी कितीही किंमत मोजायला तयार
देशाच्या सुरक्षेचा आणि लोक कल्याणाचा प्रश्न असेल तर त्यासाठी मी कितीही किंमत मोजायला तयार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बॅलेट पेपर हे उत्तम माध्यम असून ते कॉपी करता येत नाही. त्यामुळे निवडणुकीत फसवणुकीचा प्रश्नच उद्भवत नाही. बॅलेट पेपरवर वॉटरमार्क असतो. त्यामुळे हे माध्यम फसवणूकीसाठी वापरले जाऊ शकत नाही, असेही ट्रम्प व्हिडिओत नमूद करताना दिसतात.
मस्क म्हणाले, कॉम्प्युटर मतदानासाठी नाहीत
मी एलॉन मस्क यांना विचारले, कॉम्प्युटरबद्दल तुम्हाला बरेच काही माहीत आहे. मग मतदान व्यवस्थेबद्दल काय मत आहे? यावर ते म्हणाले, कॉम्प्युटर मतदानासाठी बनलेलेच नाहीत. कॉम्प्युटरमुळे खूप वेगाने व्यवहार होतात. परंतु ते मतदानासाठी योग्य नाहीत, असे मस्क म्हणाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान, मी कॉम्प्युटर जगतातील नामवंत लोकांशी चर्चा केली. माझे काका एमआयटीमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांना यातील उत्तम जाण आहे. त्यांनीही बॅलेट पेपर हाच निवडणुका घेण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. या माध्यमातून फसवणूक होऊ शकत नाही, असेच सांगितले, याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधले.