![uttamrao jankar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/uttamrao-jankar-696x447.jpg)
EVM विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्र रान पेटणार आहे. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि EVM विरोधात एल्गार पुकारला असून 19 फेब्रुवारीला मारकडवाडी ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी ही माहिती दिली. आता आक्रोश मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झाला पाहिजे, असे उत्तम जानकर म्हणाले.
सुप्रियाताई सुळे, आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या काही मंडळींनी गरुडा टीम बनवली आहे. मारकडवाडी ते मुंबई 21 दिवसांचा हा प्रवास आहे. लाँग मार्चचे नियोजन गरुडा टीम करत आहे. निवडणूक आयोगाला आणि न्यायव्यवस्थेला मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा महाराष्ट्रातला सगळा आक्रोश दिसला पाहिजे. महाराष्ट्रात लोकांचं मत काय आहे? जो आक्रोश मारकडवाडीत झाला, जो आक्रोश धानोऱ्यात झाला, तो या राज्याचा आक्रोश हा शिवाजी पार्कवर झाला पाहिजे, असे उत्तम जानकर म्हणाले.
मतदानावेळी प्रोगॅमिंग जे केलं जातं त्यावेळी व्हीव्हीपॅटच्या डोक्यावर टाईम आणि डेट सेट केली जाते. आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे मी मशीन मागितलं आहे. त्यासाठी 46, 500 रुपये भरलेले आहेत. निवडणूक आयोग नसेल देत तर या मुद्द्यावर राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांनी ओरडून काही उपयोग नाही. कुठल्याही पक्षाला हा निवडणूक आयोग दाद देत नाही. म्हणून आम्ही हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्तम जानकर म्हणाले.
EVM च्या मुद्द्यावर काँग्रेसने एक समिती नेमली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते या विरोधात मैदानात उतरलेत. निवडणूक आयोगाला आम्ही वेळ दिला होता. आता 4 दिवस बाकी आहेत. निवडणूक आयोग कुणालाही दाद देत नाही. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्तम जानकर यांनी सांगितले.