विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने राबविलेली मतदान प्रक्रिया संशयास्पद आहे. मतदान प्रक्रिया राबविताना मतदान यंत्रात भाजप आणि मित्रपक्षांनी गैरव्यवहार केला आहे. या गैरव्यवहारातून भाजप महायुतीने पाशवी बहुमत मिळविले आहे. या प्रकारामुळे लोकशाही धोक्यात आली असून या गैरव्यवहारात निवडणूक आयोगदेखील सहभागी आहे, असा आरोप करत माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे धुळे शहरात सोमवारी रात्री ईव्हीएमची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून मतदान यंत्राची होळी केली.
विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाले आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली. विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला धक्का बसला. कारण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपेक्षित मते मिळाली नाहीत, तर महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. मतदान यंत्रात भाजप आणि मित्रपक्षांनी फेरबदल केले. मतदाराने कोणत्याही उमेदवाराला मतदान केले तरी मत हे भाजप आणि मित्रपक्षाच्या उमेदवाराला नोंदवले गेले. त्यामुळे भाजप महायुतीला पाशवी बहुमत मिळाले आहे. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट होती तरीदेखील भाजपला 121 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत. यंदा तर राज्यातील कापूस, सोयाबीन, भाजीपाला विक्रेते भाजप महायुतीवर नाराज होते. त्यामुळे भाजप महायुतीला इतक्या मोठय़ा प्रमाणात मते आणि जागा मिळणे शक्य नाही. मतदान यंत्राच्या फेरबदलात भाजप महायुतीसोबत निवडणूक आयोगदेखील सहभागी झाला आहे.
या आंदोलनात माजी आमदार अनिल गोटे यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील आणि इतर पदाधिकारी होते. मशाल मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
निवडणूक आयोगाची भूमिका निषेधार्ह
स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाची भूमिका निषेधार्ह आहे. जनतेच्या भावना राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाच्या लक्षात याव्यात म्हणून आम्ही मनोहर चित्र मंदिरापासून महात्मा गांधी पुतळय़ापर्यंत मशाल मोर्चा काढला आहे. त्यात मतदान यंत्राची प्रतीकात्मक पेतयात्रा काढली. गांधींच्या पुतळय़ाला साक्षी ठेवत मतदान यंत्राचे दहन केले आहे, असे माजी आमदार गोटे यांनी सांगितले.