दरवर्षी युरोपमधून हिंदुस्थानात येतात तीन कोटी जुने टायर, या टायरचं करायचं काय?

ब्रिटनसह युरोपच्या अनेक देशांमधून जुने व भंगारातले टायर आशिया आणि आफ्रिका खंडात पाठवले जातात. हिंदुस्थानात तर दरवर्षी सुमारे तीन कोटी टायर यूकेमधून येतात. या टायरवर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यासाठी टायर मोठय़ा प्रमाणात जाळले जातात. त्यामुळे  पर्यावरणाला मोठी हानी होते तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.   युरोपमधून गरीब आणि विकसनशील देशांमध्ये टायरची मोठी निर्यात होते. यूकेमधून दरवर्षी 5 कोटी जुने टायर पुनर्प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. त्यातील निम्मे टायर हिंदुस्थानात निर्यात केले जातात. या टायरचा योग्य साठा, त्यातून होणारे प्रदूषण चिंतेचा विषय बनत चालला आहे. जुन्या टायर्सला रस्त्याचे कडेला किंवा खड्डा खणून त्यात टाकले जाते. जगभरात असे 400 कोटी टायर खड्डात पडून आहेत. त्यातील 41 टक्के टायर तर खड्डय़ातच संपुष्टात येतील, अशी परिस्थिती आहे. अनेकदा अशा टायरला आग लावण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

l देशात टायर रिसायकलिंगचे सुमारे दोन हजार तरी प्लांट आहेत. यातील काही प्लांट अधिकृत, तर काही अनधिकृतपणे म्हणजे विनापरवाना चालवले जातात.

l युरोपमधून हिंदुस्थानात आलेल्या लाखो टायर्सवर रिसायकलिंग होते. त्यांना भट्टीत टाकून जाळले जाते. तज्ञांच्या मते टायरच्या धुरातून पर्यावरणाला तसेच आरोग्याला धोका निर्माण होतो. धुरामुळे नागरिकांना कार्डियोवस्स्कुलर, न्यूरोलॉजीकल आजार किंवा विशिष्ट पॅन्सर होण्याचा धोका असतो.

टायरचे प्लांट घातक

देशात सुमारे दोन हजार पायरोलिसी प्लांट असल्याचे समजते. फॅक्टरीमध्ये  टायर ऑक्सिजनशिवाय जास्त तापमानावर जाळले जातात. त्यातून तेल आणि कार्बन निघते. कधी कधी तर यापेक्षा घातक वायू निघतो. अशा फॅक्टरी गावाजवळ असतात. त्यामुळे गावकऱ्यांना श्वसनाला त्रास, डोळ्यांची जळजळ असे त्रास होतात.