एक एक मिनिट महत्त्वाचे आहे; मदत ताबडतोब मिळाली पाहिजे! शिवसेनेची कुर्ला अपघातप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोमवारी झालेल्या कुर्ला बेस्ट बस अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 49 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे, मात्र केवळ मदत जाहीर करून उपयोग नाही तर ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, ज्यांच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे त्यांना ती मदत तातडीने मिळणे आवश्यक आहे. गंभीर जखमींसाठी एक एक मिनिट महत्त्वाचे आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या जखमींना आर्थिक मदत ताबडतोब मिळाली पाहिजे, अशी मागणी कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कुर्ला पश्चिममध्ये जिथे अपघात घडला तो भाग कलिना विधानसभा मतदारसंघात येतो. सोमवारी रात्री अपघातानंतर आमदार संजय पोतनीस यांच्यासह शिवसैनिकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत रात्रभर मदतकार्य केले. नातेवाईकांबरोबरच पोलीस आणि इतर यंत्रणांशी समन्वय साधत जखमींवर तातडीने उपचार कसे होतील, याकडे जातीने लक्ष ठेवले आहे.

मदत, शस्त्रक्रियेसाठी वेळ महत्त्वाची

अपघातातील जखमींवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, मात्र काही जखमींवर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे अशा जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुर्ला येथील हबीब रुग्णालयात सात जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींच्या घरची मंडळी ही गरीब असून शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याकडे तातडीने देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने केवळ मदत जाहीर करून थांबू नये. मेल्यानंतर मदतीचा काही उपयोग नाही. जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी आर्थिक मदत ही वेळेवर मिळाली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार संजय पोतनीस यांनी व्यक्त केली.