अंतराळ मोहिमेसाठी गुंतवणूक केलेल्या निधीचा फायदा हा समाजालाच होणार असल्याचे अंतराळ संशोधन मोहिमेने नुकत्याच केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. अंतराळ मोहिमेत गुंतवणूक करण्यात येणाऱया प्रत्येक रुपयामागे अडीच रुपयांचा नफा मिळेल, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
सोशल वेल्फेअर डिपार्टमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कर्नाटक सरकारच्या विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हिंदुस्थान अंतराळ मोहिमेत अधिक शक्तीशाली व्हावा यादृष्टीने काम करण्यात येत असून इस्रोचे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे एस. सोमनाथ म्हणाले. अंतराळ मोहिमेत देशाने वर्चस्व प्रस्थापित करावे असे वाटत असेल तर विविध मोहिमा आखण्याचे स्वातंत्र्य इस्रोला मिळायला हवे. जणेकरून अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवसायाच्या मोठय़ा संधी उपलब्ध होतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
खर्चिक चांद्रमोहिमेसाठी आम्हालाच काहीतरी करावे लागेल
चांद्रमोहीम अत्यंत खर्चिक मोहीम आहे. या मोहिमेला लागणाऱया निधीसाठी आम्हाला सरकारवर अवलंबून राहायचे नाही. त्यामुळे आम्हालाच व्यावसायिक संधी निर्माण करायला हव्यात. जर चांद्रमोहीम सुरू ठेवायची असेल तर आम्हालाच काहीतरी करावे लागेल. जर आम्ही या मोहिमेच्या माध्यमातून काही करण्याचा प्रयत्न केला तर खर्चिकपणामुळे सरकार ही मोहीम बंद करण्यास सांगेल, असेही एस. सोमनाथ म्हणाले.