चालक मद्यधुंद असला तरी नुकसानभरपाई द्यावी लागणार

अपघातग्रस्त वाहनाचा चालक त्या वेळी दारूच्या नशेत असला तरी विमा कंपनीला मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी लागेल, त्यांच्यासाठी हे बंधनकारक असेल असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान दिला. न्यायमूर्ती एम. धंडापाणी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने दिलेल्या भरपाईत वाढ करण्यासाठी अपीलकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

30 डिसेंबर 2017 रोजी चेन्नईतील थिरुनेरमलाई मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत असताना  वेगाने आणि बेपर्वाईने चालविलेल्या व्हॅनने मागून धडक दिल्याने राजशेखरन नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राजशेखरनच्या कुटुंबातील भुवनेश्वरी आणि इतरांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी करताना न्यायालयाने हे सांगितले. 2013 मध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करून न्यायालयाने असे म्हटले की, पॉलिसी दस्तऐवजात दारू पिऊन गाडी चालवणे हे पॉलिसीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन आहे, असे असले तरीही विमा कंपनीने मृत व्यक्तीला नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे.