केंद्र सरकारने 10 वर्षे अडवून धरलेला मराठीचा अभिजात दर्जा दिला तरी त्याचे निश्चित लाभ मराठीच्या पदरी कधी आणि कसे पडणार, हे स्पष्ट करण्याची मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीने केली आहे. यासंदर्भातील पत्र पेंद्राचे संस्कृती मंत्री आणि सचिवांना नुकतेच पाठवण्यात आले.
यासंदर्भात मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आम्ही सततचा पाठपुरावा केला. दर्जा दिल्यानंतर मिळणाऱया नेमक्या लाभांची तपशीलवार माहिती मराठी भाषिक समाजाला करून द्यावी, अशी मागणी आम्ही पत्राद्वारे केली आहे.
केंद्राने द्यावयाच्या एकूण निधीची रक्कम किती, त्यातील 2024-25 या वर्षात तो किती व केव्हा उपलब्ध करून देणार, दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याची जबाबदारी कोणत्या यंत्रणेची, त्यांचे नियम, अटी इत्यादी तसेच सर्व केंद्रीय विद्यापीठांमधून मराठीचे अध्ययन, अध्यापन, संशोधन केव्हा सुरू होणार, त्याच प्रमाणे मराठीचे सेंटर ऑफ एक्सलन्स कोणी व कसे स्थापन करायचे आहे, त्यासाठीचा निधी मराठीला केव्हा, किती, कसा उपलब्ध होणार, हे सारे तपशीलवार कळवावे, जेणेकरून आम्ही त्या त्या यंत्रणांकडे पाठपुरावा करू शकू अशी विनंती पत्रात केल्याचे डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले.