एकाने बलात्कार केला व अन्य आरोपींनी अत्याचार केला नसला तरी त्यांना सामूहिक बलात्काराची शिक्षा दिली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
सामूहिक बलात्काराची शिक्षा झालेल्या दोन आरोपींनी त्याविरोधात अपील याचिका केली होती. पीडितेच्या मित्राला आम्ही पकडून ठेवले होते. आम्ही बलात्कार केला नाही. तरीही आम्हाला सत्र न्यायालयाने सामूहिक बलात्काराची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा रद्द करावी, अशी मागणी अपील याचिकेत करण्यात आली होती. ही अपील याचिका फेटाळून लावत न्यायालयाने आरोपींची शिक्षा कायम ठेवली.
मित्र वाचवू शकला असता
या दोन आरोपींनी पीडितेच्या मित्राला पकडून ठेवले. अन्य दोन आरोपींनी तिच्या बलात्कार केला. आरोपींनी पकडून ठेवले नसते तर मित्र पीडितेला वाचवण्याचा प्रयत्न करू शकला असता. आरोपींना ज्ञात होते की पीडितेवर अत्याचार होतोय. याचा अर्थ आरोपींचा गुह्यात सहभाग होता. त्यांचा हेतू गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. अशा परिस्थितीत ग्रुपमधील एकाने जरी बलात्कार केला तरी अन्य आरोपी सामूहिक बलात्काराच्या शिक्षेस पात्र ठरतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
काय आहे प्रकरण
2015मध्ये चंद्रपूरमध्ये ही घटना घडली. पीडिता तिच्या मित्राला भेटायला गेली होती. ते दोघे एका ठिकाणी बसून बोलत होते. तेव्हा आरोपी शुभम, संदीप, कुणाल व अशोक तेथे आले. आम्ही वन अधिकारी आहोत, असे त्यांनी सांगितले. आरोपींनी या दोघांकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. पीडितेवर शुभम व संदीपने बलात्कार केला. कुणाल व अशोकने पीडितेच्या मित्राला पकडून ठेवले होते. त्यानंतर हे चौघे पळून गेले. घटनास्थळी वन अधिकारी आले. पोलिसांनी आरोपींना अटक केली. सत्र न्यायालयाने या चौघांनाही सामूहिक बलात्कारासाठी 20 वर्षांची शिक्षा व दंड ठोठावला.