स्पेनटास्टिक! युरो कप चौथ्यांदा जिंकण्याचा स्पेनचा पराक्रम

फॅण्टास्टिक… स्पेन फुटबॉल संघाच्या नॉनस्टॉप आणि अपराजित खेळाने आज अवघ्या विश्वाची मनं जिंकली. त्यांनी इंग्लंडचे 58 वर्षांपासूनचे जेते पदाचे स्वप्न पुन्हा एकदा उद्ध्वस्त करताना युरो कपच्या इतिहासात चौथ्यांदा बाजी मारत आपल्या जेतेपदाला चार चांद लावले. एवढेच नव्हे तर एका स्पर्धेतील सर्वच्या सर्व सात सामने जिंकत अपराजित राहण्याचाही इतिहास रचला. त्यांना एका तपाच्या म्हणजे 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर युरो कप जिंकण्यात यश मिळाले. मात्र दुसरीकडे युरो कप जिंकण्यासाठी जिवाचे रान करणाऱया इंग्लंडची जेतेपदाची कहाणी पुन्हा एकदा अधुरीच राहिली. सलग दुसऱयांदा फायनल गाठलेल्या इंग्लंडला या वेळी स्पेनने 2-1 फरकाने हरवले.

मोठय़ा स्पर्धेत फायनल खेळणारा यमाल पहिला युवा फुटबॉलपटू
स्पेनचा लामीन यमाल हा युरो कप स्पर्धेच्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरताच मोठय़ा स्पर्धेची फायनल खेळणारा तो सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला. 17 वर्षे एक दिवसाचा असताना यमालने युरो कपची फायनल खेळून ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचा 66 वर्षांपूर्वीचा हा विक्रम मोडला. 1958च्या फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळताना पेले यांचे वय 17 वर्षे 249 दिवस होते. याचबरोबर फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य लढतीत गोल करून यमल हा युरो कप स्पर्धेत गोल करणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला. यमाल स्पर्धेतील सर्वेत्तम युवा खेळाडूही ठरला.

इंग्लंड म्हणजे फुटबॉलमधील चोकर्स
स्पेन-इंग्लंड यांच्यातील अंतिम लढतीतील मध्यांतर गोलशून्य बरोबरीत सुटला. मात्र स्पेनच्या निको विल्यम्सने 47व्या मिनिटाला लामीन यमालच्या पासवर सुरेख गोल करीत आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर इंग्लंडने अनेक धोकादायक चाली रचत स्पेनवर पलटवार करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. अखेरच्या 73व्या मिनिटाला त्यांच्या प्रयत्नांना यश आले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या कोल पामरने गोल करीत इंग्लंडला 1-1 असे बरोबरीत आणले. इंग्लंडने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त खेळ केला होता. आता इंग्लंडचे पारडे थोडे जडही वाटत होते. मात्र ही बरोबरीची कोंडी काही फुटत नव्हती. सामना आता अतिरिक्त वेळेत जाणार असेच सर्वांना वाटत होते. इतक्यात 87व्या मिनिटाला मिकेल ओयारजाबलने मार्क कुकुरेलाच्या क्रॉसवर अचूक गोल करीत स्पेनला 2-1 असे आघाडीवर नेताच इंग्लंडच्या गोटात स्मशानशांतता पसरली. स्पेनच्या खेळाडूंनी मैदानावर, तर समर्थकांनी स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला. इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरला.

इंग्लंडच्या जेतेपदाचा दुष्काळ
सलग दुसऱयांदा युरो कपब फुटबॉल स्पर्धेची फायनल गाठल्यानंतरही इंग्लंडला या वेळीही उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. या संघाचा 58 वर्षांपासून सुरू असलेला जेतेपदाचा दुष्काळ काही केल्या संपेना. स्पेनने एकही पराभव न स्वीकारता युरो कपच्या फायनलमध्ये धडक दिली होती. इंग्लंडने मागील तीन लढतींत पिछाडीनंतर विजय मिळवीत स्पर्धेत आगेकूच केली होती. स्पेन व इंग्लंड सहा वर्षांनंतर एकमेकांना भिडले. 2018च्या नेशन्स लीगमध्ये उभय संघांत डबल हेडर सामना झाला होता. यात पहिल्या लढतीत स्पेनने 2-1ने बाजी मारली होती, तर दुसरी लढत इंग्लंडने 3-2 फरकाने जिंकून पराभवाचे उट्टे काढले होते.

सहा खेळाडूंना ‘गोल्डन बूट’ पुरस्कार
इंग्लंडच्या हॅरी केनसह स्पेनचा दानी ओल्मो, जर्मनीचा जमाल मुसियाला, नेदरलॅण्डचा कोडी गाकपो, स्लोवाकियाचा इवान शरांज व जॉर्जियाचा जॉर्जेस एम हे युरो चषक स्पर्धेत गोल्डन बुटाचे मानकरी ठरले. यूएफाने हा नवीन नियम केलाय. गतवर्षी या स्पर्धेत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो व झेक प्रजासत्ताकचा पॅट्रिक शिक यांनी 5-5 समान गोल केले होते. मात्र एक गोल करण्यात सूत्रधार ठरल्यामुळे रोनाल्डो ‘गोल्डन बूट’ पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

स्पेनचा जेतेपदाचा विक्रम
युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक चार वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम स्पेनच्या नावावर जमा झाला. याआधी स्पेन व जर्मनी यांच्या नावावर 3-3 युरो कपचे जेतेपद होते. आता स्पेनने जर्मनीला मागे टाकत सर्वाधिक चौथ्यांदा जेतेपदावर आपले नाव कोरले. इटली व फ्रान्स यांच्या नावावर 2-2 विजेतेपद आहेत.