Euro Cup 2024 : इंग्लंड युरोचा हीरो होणार? पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी साहेबांनी लावली ताकद

गेली 58 वर्षे जगज्जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला इंग्लंडचा संघ प्रथमच युरो कपचा हीरो होण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहे. नेदरलॅण्ड्सविरुद्ध परवा होणाऱया उपांत्य सामन्यात इंग्लिश संघ त्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकेल.

युरो कपच्या 64 वर्षांच्या इतिहासात इंग्लंड हा असा एकमेव संघ आहे, ज्याला कधीही युरो कप उंचावण्याचे भाग्य लाभलेले नाही. गेल्या स्पर्धेत म्हणजेच 2020 मध्ये त्यांनी युरो कपच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारली होती, पण इटलीने पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचे जेतेपदाचे स्वप्न भंग केले होते. गेल्या 64 वर्षांत इंग्लंडचा संघ अकराव्यांदा युरो कपमध्ये खेळतोय, पण त्यांना केवळ तीनदाच उपांत्य फेरी गाठता आली होती आणि आता ते चौथ्यांदा ही किमया साधत आहेत.

1968 साली इंग्लंडने सर्वप्रथम युरो कपमध्ये सहभाग नोंदवला होता. जगातील सर्वाधिक फुटबॉल इंग्लंडमध्ये खेळला जात असला तरी या संघाला कधीही युरोपियन देशांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करता आलेले नाही. गेल्या वेळी हॅरी केनच्या नेतृत्वाखाली ते आपल्या स्वप्नांच्या समीप पोहोचले होते, पण इटलीने त्यांचा स्वप्नभंग केला होता. गेल्या वेळी भंगलेले स्वप्न साकार करण्यासाठी इंग्लंडचे सर्व खेळाडू सज्ज झालेत.

केन खेळणार की विश्रांती…?
सलग दुसऱयांदा इंग्लंडचे नेतृत्व करत असलेला केन आपल्या कारकीर्दीचा शेवटही युरोचा हीरो म्हणून करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात झटापटीच्या क्षणी त्याला दुखापत झाल्यामुळे मैदानाबाहेर जावे लागले होते. आता केनने आपण उपांत्य फेरीसाठी फिट असल्याचे सांगितले असले तरी त्याच्या संघसमावेशाबाबत साशंकता आहे.

इंग्लंडची कामगिरी सामान्य
इंग्लंडला युरो कपच्या साखळी सामन्यात तीनपैकी केवळ एका सामन्यातच यश मिळवता आले होते. केवळ सर्बियाविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात त्यांनी 1-0ने बाजी मारली. मात्र त्यानंतर डेन्मार्क आणि स्लोव्हेनियाविरुद्धचे सामने बरोबरीत सुटले होते. तसेच स्लोव्हाकियाविरुद्धचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना 2-1 ने जिंकत आगेकूच केली होती. या संघर्षपूर्ण सामन्यातही स्लोव्हाकिया 1-0 ने आघाडीवर होती आणि इंग्लंडने शेवटच्या क्षणी स्टॉपेज टाइममध्ये गोल करत विजयाचे थरारक चुंबन घेतले होते. स्वित्झर्लंडविरुद्ध संघर्ष पेनल्टी शूटआऊटमध्ये निकाली निघाला. म्हणजेच इंग्लंडला विजयासाठी प्रत्येक संघाशी अटीतटीचा संघर्ष करावा लागला आहे.

नेदरलॅण्डससुद्धा युरोच्या प्रतीक्षेत
डच संघाने 1988 साली आपला पहिला-वहिला युरो कप जिंकला होता. त्यानंतर त्यांचा संघ कधीही अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. विशेष म्हणजे, ते चार वेळा उपांत्य फेरीत हरलेत. म्हणजेच ते सहाव्यांदा आपला उपांत्य सामना खेळणार आहेत. गेली 36 वर्षे ते जेतेपदापासून दूरच आहेत आणि अंतिम फेरीपासूनही. इंग्लंडला नमवून या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचे ध्येय त्यांनीही समोर ठेवले आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ आपले ध्येय गाठतो ते बुधवारी मध्यरात्रीच कळेल.

युरो कपचे बादशहा आमनेसामने
युरो कपचा पहिला उपांत्य सामना म्युनिक येथे फ्रान्स आणि स्पेन या बादशहा संघांमध्ये खेळला जाणार आहे. स्पेनने तब्बल तीनदा तर फ्रान्सने दोनदा युरो कप जिंकलाय. स्पेनने तर 2008 आणि 2012 असे सलग दोन युरो कप जिंकत इतिहास रचला होता. त्यांनी 2010 साली फिफा वर्ल्ड कप जिंकत सलग दोन्ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. असाच पराक्रम फ्रान्सने 1998 साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2000 साली युरो कपवर आपले नाव कोरले होते. असे हे दिग्गज एकमेकांशी भिडणार आहेत. युरो कपमध्ये स्पेनसह जर्मनी यांनी सर्वाधिक तीनदा बाजी मारली आहे. स्पेनला चौथ्यांदा युरो कप जिंकून नवा इतिहास रचता येईल, तर फ्रान्स दोनदा अजिंक्य ठरलाय. त्यांना स्पेन-जर्मनीची बरोबरी साधण्याची संधी आहे.