Euro 2024: स्पेनकडून जॉर्जियाचा धुव्वा

स्पेनच्या रॉबिन ले नॉर्मंडने 18 व्या मिनिटाला स्वयंगोल करून जॉर्जियाला 1-0 असे आघाडीवर नेले होते, मात्र त्यानंतर रॉड्री, फॅबियन रुइज, निको विल्यम्स व डॅनी ओल्मो यांच्या दणादण गोलच्या जोरावर स्पेनने जॉर्जियाचा 4-1 गोल फरकाने धुव्वा उडवीत ‘युरो चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.

जेतेपदाचे संभाव्य दावेदार असलेल्या स्पेनने स्वयंगोलच्या रूपाने या स्पर्धेतील पहिला गोल स्वीकारला. मध्यंतरापूर्वी सहा मिनिटे अगोदर म्हणजे 39 व्या मिनिटाला मॅन्चेस्टर सिटीचा मिडफिल्डर रॉड्रीने गोल करीत स्पेनला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर फॅबियन रुइजने 51 व्या मिनिटाला गोल करीत स्पेनला 2-1 असे आघाडीवर नेले. मग निको विल्यम्सने 75 व्या मिनिटाला, तर डॅनी ओल्मोने 83 व्या मिनिटाला गोल केले. ही आघाडी टिकवीत स्पेनने 4-1 गोल फरकाने बाजी मारत आगेकूच केली. आता स्पेनच्या मार्गात शुक्रवारी यजमान जर्मनीचा अडथळा असेल.