मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून अपघाताची बातमी समजताच संगमेश्वर पोलीस दाखल झाले. जखमींना 108 रुग्णवाहिका व खासगी वाहनाने संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा (34) मूळ राहणार फरिदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता, तर वॅगनरचालक ओंकार शंकर घाडगे (23), राहणार पाटण (आंबळे ) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वॅगनरला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून या एर्टिगा चालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा (58) अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा (24) राहणार अंधेरी) यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव सुरू होता.
वॅगनरमधील ओंकार घाडगे (23), अभिजित अशोक खरात (24) राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने (20) राहणार सोलापूर यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले आहे. अपघात झाल्यामुळे मुंबई तसेच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल अवॉर्ड यांनी अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी पोहचून रखडलेली वाहतूक सुरळीत केली.