राज्यात साथीच्या आजारांचा धोका वाढला असून वर्षभरात डेंग्यूमुळे 26 जणांचा तर मलेरियामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक मृत्यू मुंबईत, तर मलेरियाचे सर्वाधिक मृत्यू गडचिरोली जिह्यात झाले आहेत.
राज्यात 21 नोव्हेंबरपर्यंत मलेरियाचे 18 हजार 477 रुग्ण सापडले असून त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी मलेरियाचे 16 हजार 159 रुग्ण आढळले होते आणि 19 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्ण संख्येत यंदा वाढ झाली आहे. राज्यात डेंग्यूचे एकूण 18 हजार 156 रुग्ण आढळले असून त्यातील 26 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी डेंग्यूचे 19 हजार 34 रुग्ण आढळले होते आणि त्यातील 55 जणांचा मृत्यू झाला होता.
राज्यात मलेरियाचे सर्वाधिक 7 हजार 43 रुग्ण मुंबईत सापडले. त्याखालोखाल गडचिरोली जिल्हय़ात 6 हजार 235, पनवेल महापालिका 867, ठाणे महापालिका 688, चंद्रपूर जिल्हा 503 आणि रायगडमध्ये 467 रुग्ण सापडले. मलेरियाचे सर्वाधिक 11 मृत्यू गडचिरोलीत झाले असून त्याखालोखाल मुंबईत 5 जणांचा मृत्यू झाला. डेंग्यूचे सर्वाधिक 5 हजार 435 रुग्ण मुंबईत सापडले, तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला.
चिकनगुनिया रुग्णांची संख्याही वाढली
गेल्या वर्षी राज्यात चिकनगुनियाचे 1 हजार 702 रुग्ण आढळले होते. यंदा 21 नोव्हेंबरपर्यंत चिकनगुनियाचे 5 हजार 360 रुग्ण आढळले आहेत. चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. मात्र चिकनगुनियाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.