EPFO खातेधारकांसाठी एक मोठे अपडेट समोर आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा केली आहे. 2024 या वर्षाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांत पीएफची रक्कम थेट एटीएममधून काढता येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, आता EPFO त्यांची नवीन सॉफ्टवेअर प्रणाली EPFO 3.0 या वर्षी जूनपर्यंत लॉन्च करण्यास तयार आहे, अशी माहिती मनसुख मांडविया यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
EPFO 3.0 लाँच केल्यानंतर, EPFO आपल्या सदस्यांना एटीएम कार्ड प्रदान करेल. जानेवारी 2025 च्या अखेरीस वेबसाइट आणि सिस्टीममधील सुधारणांचा प्राथमिक टप्पा निश्चित केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच खात्यात जमा होणाऱ्या इतर मासिक उत्पन्नाबाबत तसेच इतर नवीन योजनांबाबत माहिती देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
7 लाखांपर्यंत रक्कम काढता येणार
नवीन प्रणालीद्वारे लाभार्थी एटीएमद्वारे त्यांच्या हक्काची रक्कम काढू शकतील. तसेच मृत सदस्यांच्या वारसांना ईपीएफओद्वारे चालवल्या जाणाऱ्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) या योजनेंतर्गत कमाल सात लाख रुपये काढता येतील. याशिवाय मृत ईपीएफओ सदस्याचा वारस देखील पैसे काढण्यासाठी एटीएम वापरण्यास सक्षम असेल.
मोबाईल बँकिंग प्रमाणेच मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध
मोबाईल बँकिंग प्रमाणेच मोबाईल ॲपची सुविधा देखील देण्यात येणार आहे. EPFO खात्यांसाठी एक विशेष ॲप तयार केला जात आहे. ज्याद्वारे सदस्य त्यांच्या खात्यात येणारे मासिक योगदान, पेन्शन फंड, मागील नोकऱ्यांचे योगदान इत्यादी गोष्टी पाहू शकतात. एवढेच नाही तर ते मोबाईल ॲपद्वारे त्यांच्या पीएफ खात्यावर लक्ष ठेवू शकतात.