
ईपीएफ पेन्शनर संघांच्या अखिल भारतीय समन्वय समितीतर्फे येत्या मंगळवारी कोल्हापूरच्या प्रॉव्हिडंट फंड कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्यालयांवर हा धडक मोर्चा निघणार आहे. प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी पेन्शनधारकांची व देशाची फसवणूक करीत आहेत. राज्यघटनेने दिलेली जबाबदारी टाळत आहेत. त्यामुळे तीव्र आंदोलनाखेरीज मार्ग नाही, या निष्कर्षाला समन्वय समिती आली आहे.
प्रत्येकाला किमान 9000 रुपये पेन्शन, अधिक महागाई भत्ता, प्रवासात सवलत, संपूर्ण मोफत वैद्यकीय सेवा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे. सरकारी पेन्शनधारकांना सरकारकडून पुरेसे लाभ दिले जातात, मात्र खासगी कार्यालयातील पेन्शनधारकांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.