निकाल वेळेवर लावणे, कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात सातत्याने नापास होत असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला अचानक जातीय संसर्ग झाला आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता ‘जात’ दाखवून परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे. मंडळाने दहावीच्या हॉलतिकिटावर जातीचा उल्लेख करून निष्कारण नव्या वादाला जन्म घातला आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर 24 तासांतच सरकारने निर्णयाबाबत माघार घेतल्याचे समजते.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. यंदा दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ती 17 मार्चपर्यंत चालणार आहे, तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हॉलतिकीट देताना मंडळातील महाभागांनी त्यावर चक्क जातीचा उल्लेख केला आहे. मंडळाने केलेल्या हा अगोचरपणा पाहून शिक्षक अवाकच झाले. शिक्षणतज्ञांनी तर मंडळाची अक्कल गहाण पडली आहे काय, असा संतप्त सवाल केला.
हॉलतिकीट कशासाठी?
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यासाठी हॉलतिकीट देण्यात येते. त्यावर विद्यार्थ्याचे नाव, केंद्र क्रमांक, आसन क्रमांक, विषय आदींचा तपशील असतो. महाराष्ट्रात जेव्हापासून परीक्षा घ्यायला सुरुवात झाली तेव्हापासून कधीही हॉलतिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आला नव्हता. शाळा, कॉलेज सोडण्याच्या प्रमाणपत्रावर म्हणजेच टीसीवर मात्र जात, उपजातीचा उल्लेख करण्यात येतो. परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्याखेरीज हॉलतिकिटाचा कुठेही वापर होत नाही हे विशेष.
मंडळाच्या अध्यक्षांचा हास्यास्पद खुलासा
दहावी, बारावीच्या हॉलतिकिटावर जातीचा उल्लेख का करण्यात आला आहे याचा अत्यंत हास्यास्पद खुलासा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केला आहे. हॉलतिकिटावर फक्त प्रवर्गाचा उल्लेख आहे. सामाजिक न्याय विभागाकडून वेगवेगळय़ा प्रकारच्या शिष्यवृत्त्या देण्यात येतात. शिष्यवृत्ती मिळवताना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये यासाठी प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्याच्या जातीचा उल्लेख टीसीवर असतो. त्यात चूक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते आणि ते टाळण्यासाठी हॉलतिकिटावरही प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा शरद गोसावी यांनी केला.