फेब्रुवारीपासून संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीला खुला होणार; 60 मीटर लांब, 560 टनाचा गर्डर जोडण्याचे काम पूर्ण

मुंबईची वाहतूककोंडी फोडून वेळ आणि इंधन बचत करणाऱया कोस्टल रोड प्रकल्पावरील मरीन ड्राइव्हवरून वांद्रेकडे जाणाऱया दिशेने कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंकला जोडणारा तिसरा आणि शेवटचा गर्डर बसवण्याचे काम आज सकाळी पूर्ण झाले. हा गर्डर 60 मीटर लांब आणि 560 टनाचा असून याआधी अशाच वजनाचे दोन गर्डर बसवण्यात आले आहेत. ही मार्गिका जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुली होणार आहे. दरम्यान, कोस्टल रोड शिवडी-न्हावा शेवा उड्डाणपुलाला जोडला गेल्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत प्रकल्पाचे 93.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. सुमारे 14 हजार कोटी खर्च करून प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. कोस्टल रोडच्या कामात मुंबईचे वैभव असणाऱया ‘राणीच्या हारा’ला कोणताही धक्का लागणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी रस्त्याच्या बांधकामात दोन किमीचे दोन महाकाय बोगदे जमिनीखाली 70 मीटर खाली खोदण्यात आले आहेत. यातील एक बोगदा 12 मार्चला वरळी ते मरीन ड्राइव्ह हा मार्ग प्रवासासाठी सुरू करण्यात आला आहे तर मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतचा मार्गही जून महिन्यात सुरू करण्यात आला.

डेडलाईन पुन्हा हुकली

संपूर्ण कोस्टल रोड मे महिन्यापासून सुरू होईल, असे सुरुवातीला मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जूनची डेडलाईन देण्यात आली. मात्र, तीही पाळणे शक्य झाले नाही. त्यानंतर जानेवारी महिना आणि आता फेब्रुवारीपर्यंत हा संपूर्ण प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मरीन ड्राइव्ह ते वांद्रे 12 मिनिटांत

10.58 किमीचा कोस्टल रोड आणि 4.5 किमी लांबीचा वांद्रे वरळी सी लिंक जोडण्यासाठी आज तिसरा आणि शेवटचा महाकाय गर्डर बसवण्यात आला. यावरून जानेवारी महिन्यात सिमेंट-काँक्रीट, अस्फाल्ट करणे अशी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीनंतर वरळी ते वांद्रे सी लिंक असा थेट प्रवास केवळ 12 मिनिटांत करणे शक्य होणार आहे. यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककाsंडी कमी होणार आहे.