
1995 साली आलेल्या ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ चित्रपटात बॅटमॅनची भूमिका साकारणारे ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेते व्हॅल किल्मर यांचे मंगळवारी लॉस एंजेलिस येथे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांची मुलगी मर्सिडीज किल्मर हिने वडिलांचा मृत्यू न्यूमोनियाने झाल्याची माहिती दिली.
व्हॅल किल्मर अनेक वर्षांपासून घशाच्या कर्करोगाशी झुंजत होते. 2014 मध्ये पहिल्यांदा कर्करोगाचे निदान झाले आणि त्यातून ते बरेदेखील झाले होते, मात्र तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक होती. जुलै 2021 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘व्हॅल’ या त्यांच्या आयुष्यावरील माहितीपटात या आजाराशी त्यांचा लढा दाखवण्यात आला होता. लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेल्या व्हॅल किल्मर यांनी अभिनय कारकीर्दीची सुरुवात थिएटरपासून केली. 1980 च्या दशकात ‘टॉप गन’ सारख्या चित्रपटांमधून ते विशेष प्रसिद्ध झाले.
आजारपणातही साकारली भूमिका
1995 मध्ये त्याने ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ मध्ये मायकेल कीटनची जागा घेऊन ब्रूस वेनची प्रतिष्ठत भूमिका साकारली. ‘बॅटमॅन’मधील त्यांच्या भूमिकेला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आणि त्यानंतर जॉर्ज क्लूनी यांची भूमिका असणाऱया या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये ते परतले नाहीत. नंतरच्या काळात आजारपणामुळे त्यांच्या बोलण्यावर परिणाम झाला. तरीही त्यांनी ‘टॉप गन ः मॅव्हरिक’ (2021) मध्ये छोटीशी भूमिका साकारली.