उंबरठा एकांकिका स्पर्धेत ‘चिनाब से रावी तक’ ठरले सर्वोत्कृष्ट

उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने आयोजित ‘उंबरठा’ या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात पार पडली. या स्पर्धेत ‘चिनाब से रावी तक’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. 25 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘जुगाड लक्ष्मी’ या एकांकिकेसाठी अभिजित बनसोडे सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘अविघ्नेया’ या एकांकिकेसाठी श्रावणी ओव्हळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

ना. म. जोशी मार्ग येथील उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी ‘उंबरठा’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे 21 वे वर्ष होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी 8 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत रंगली. त्यात 31 संघांनी एकांकिकेचे सादरीकरण केले. अंतिम फेरीत ‘जनता नगर के लंगडे घोडे’ (रामनारायण रुईया महाविद्यालय), ‘कुक्कुर’ (ज्ञानसाधना विद्यालय, ठाणे), ‘अविघ्नेया’ (सिडनहॅम कॉलेज), ‘चिनाब से रावी तक’ (क्राऊड नाटय़संस्था, डोंबिवली), ‘सेक्स ऑन व्हिल’ (तिसरी घंटा), ‘ब्रह्मपुरा’ (एम.डी. कॉलेज), ‘जुगाड लक्ष्मी’ (खालसा महाविद्यालय) या सात एकांकिकांमध्ये चुरस रंगली. या स्पर्धेचे परीक्षण अभिनेते संजय मोने आणि नाटय़ लेखक कुमार सोहनी यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभाला आमदार सुनील शिंदे, अभिनेत्री मेधा मांजरेकर आणि दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड (मार्पेट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे, संस्थेचे अध्यक्ष दीपक निकम, कला विभागप्रमुख आदित्य कदम आदी उपस्थित होते.