पहाटे साडेतीन ही चौकशीची कुठली वेळ? सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले

एखाद्याला कधीही, कुठल्याही वेळी चौकशीला बोलावणाऱया ईडीला आज सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. एखाद्याची झोपमोड करून त्याची अर्ध्या रात्री किंवा पहाटे साडेतीन वाजता चौकशी करण्याची ही कुठली वेळ, असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. पहाटे साडेतीन वाजता एखाद्याची चौकशी करणे म्हणजे त्या व्यक्तीच्या झोपेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

ईडीने केलेल्या अटकेविरोधात राम कोटुमल इसरानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. या व्यक्तीची पहाटे साडेतीन वाजल्यापासून चौकशी करण्यात आली आणि नंतर पहाटे साडेपाच वाजता अटक करण्यात आली. या याचिकेवर न्यायमूर्ती कुमार मिश्रा आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी इसरानी यांना ईडीने चक्क पहाटे साडेतीन वाजता चौकशी केल्यावरून खंडपीठाने ईडीला फैलावर घेतले. दरम्यान, याचिकेवरील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिले आव्हान

ईडीची अटक बेकायदा असल्याचे सांगत इसरानी यांनी आधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने इसरानी यांची अटक वैध असल्याचे सांगितले; परंतु ईडीने त्यांना ज्याप्रकारे वागवले त्यावरून उच्च न्यायालयानेही ईडीला फटकारले होते. अर्ध्या रात्री किंवा पहाटे साडेतीन वाजता एखाद्याला चौकशीला बोलावणे म्हणजे त्याच्या झोपेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. मात्र याचिकाकर्त्याला समन्स बजावण्यात आले तेव्हा त्याने ईडीच्या कार्यालयात प्रवेश केला होता तो अटकेत नव्हता, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने या व्यक्तीची अटक वैध असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याचिकाकर्त्याची बाजू

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी इसरानी यांची बाजू मांडली. एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला तत्काळ किंवा लवकरात लवकर महानगर न्यायदंडाधिकाऱयां समोर हजर करणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु ईडीने असे न करून कलम 22(2) चे उल्लंघन केल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

ईडीने काय बाजू मांडली

ईडीच्या वकिलांनी सिब्बल यांच्या युक्तिवादप्रकरणी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितली. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी जुलैपर्यंत तहकूब केली.

z सिब्बल यांनी आपल्या अशिलाला अंतरिम जामीन देण्याची विनंती केली, मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला.

नेमके प्रकरण काय?

ईडीने आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी राम कोटुमल इसरानी यांना 7 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता चौकशीसाठी बोलावले होते. कार्यालयात जाताच त्यांचा पह्न काढून घेण्यात आला आणि त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. 7 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच इसरानी ईडीच्या निगराणीखाली होते. दुसऱया दिवशी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजल्यापासून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली आणि साडेपाच वाजता त्यांना अटक करण्यात आली.